National News : केंद्रीय मंत्री जुआल ओरम यांच्या पत्नी झिंगिया ओरम यांचं निधन झालं आहे. काही दिवसांपासून त्या डेंग्यूवर उपचार घेत होत्या. पण, डेंग्यूनं त्यांचा जीव घेतला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री जुआल ओरम यांनाही डेंग्यूची लागण झाली असून त्यांच्यावर उपचारही सुरू आहेत. अद्याप केंद्रीय मंत्र्यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री आणि त्यांच्या पत्नीला लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदानानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती.
ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी झिंगिया ओरम यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ही बातमी ऐकून खूप दु:ख झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सीएम माझी यांनी झिंगिया यांचं वर्णन एक दयाळू, मृदूभाषी व्यक्ती, जे सामाजिक आणि सेवाभावी कार्यात व्यस्त होते, असं केलं आहे. तसेच, ते पुढे म्हणाले की, जुआल यांच्या दीर्घ राजकीय प्रवासात झिंगिया यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या घटनेमुळे जुआल यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या सुंदरगढमधील लोकांवरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आठवड्याहून अधिक काळापासून सुरू होते उपचार
मुख्यमंत्र्यांसह कायदामंत्री पृथ्वीराज हरिचंदन, आरोग्यमंत्री मुकेश महालिंग, विधानसभा अध्यक्ष सुरमा पाधी आणि अन्य भाजप नेत्यांनी दिवंगत झिंगिया ओरम यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, झिंगिया यांना डेंग्यूची लागण झाल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या 9 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या तब्येतीत कोणतीही सुधारणा झाली नाही, त्यानंतर त्यांनी वयाच्या 58 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
केंद्रीय मंत्री जुआल ओरम कोण?
ओडिशातील सुंदरगढ जिल्ह्यातील एका गरीब आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या ओरावचे सुरुवातीचे आयुष्य गरिबी आणि कष्टानं भरलेलं होतं. आव्हानं असूनही, त्यांनी उच्च शिक्षण घेतलं आणि 1989 मध्ये राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी 6 वर्षे सहाय्यक फोरमॅन म्हणून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली. त्यानंतर ओरम यांनी 1989 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.
ओदिशाचे भाजप नेते जुआल ओरम यांनी मोदी सरकार 3.0 मध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. जुआल ओराव हे 1999 ते 2004 या काळात अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. दरम्यान, ओरम हे 2014 ते 2019 पर्यंत आदिवासी व्यवहार मंत्री म्हणून पंतप्रधान मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा एक भाग होते, परंतु त्यांच्यानंतर अर्जुन मुंडा यांनी पदभार स्वीकारला. यावेळी झारखंडमधील खुंटीमधून अर्जुन मुंडा लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात जुआल ओरम यांनी पुनरागमन केलं.