BS Yediyurappa:  कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा हे लवकरच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भाजपच्या हायकमांडनं त्यांचं वय आणि प्रकृती लक्षात घेता त्यांचा राजीनामा मागितला आहे. मात्र या वृत्ताबाबत मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी इन्कार केला आहे. येडियुरप्पा यांनी आपल्या राजीनाम्याची अफवा असल्याचं म्हणत हे वृत्त खोटं असल्याचं म्हटलं आहे. 


एबीपी न्यूजच्या सूत्रांच्या माहितीनुसार वाढतं वय आणि प्रकृतीच्या तक्रारींमुळं येडियुरप्पा यांचं मुख्यमंत्रीपद जाण्याची शक्यता आहे. शुक्रवारी पंतप्रधान मोदी यांच्याशी भेट झाल्यानंतर येडियुरप्पा यांनी राजीनामा देण्याचं म्हटलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज येडियुरप्पा यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचीही भेट घेतली. या भेटीतही येडियुरप्पांनी राजीनाम्याचा मुद्दा काढला. त्यानंतर भाजप हायकमांडनं त्यांना आश्वस्त केलं आहे की, लवकरच कर्नाटकच्या पुढील मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय घेतला जाईल. लवकरच विधिमंडळ गटनेत्यांची बैठक होईल तोवर येडियुरप्पा मुख्यमंत्री असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.  


कर्नाटकने अलमट्टी धरणावर रियल टाईम डेटा सिस्टीम बसवावी; जयंत पाटलांची कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी


कोण होणार कर्नाटकचा पुढील मुख्यमंत्री 
जर येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला तर कर्नाटकचा पुढील मुख्यमंत्री कोण असणार हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. जर त्यांनी राजीनामा दिला तर लगेच नवीन मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर होईल. येडियुरप्पा यांच्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सर्वात पुढं असलेलं नाव आहे प्रल्हाद जोशी यांचं. प्रल्हाद जोशी हे मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. ते उत्तर कर्नाटकमधून खासदार आहेत. प्रल्हाद जोशी यांच्यासह  बीएल संतोष यांचंही नाव चर्चेत आहे. बीएल संतोष बऱ्याच वर्षांपासून भाजपचे संघटन मंत्री म्हणून काम करत आहेत. सोबतच उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, भाजप नेते मुर्गेश निराणी आणि वसवराज एतनाल यांची नावं देखील चर्चेत आहेत.