मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) या 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प (Budget) संसदेत सादर करतील. 31 जानेवारी रोजी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार असून 9 जानेवारीपर्यंत हे अधिवेशन सुरु राहणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात होईल.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संसदेचं हे अर्थसंकल्पीय अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. त्यामुळे या बजेटमध्ये काही महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची देखील शक्यता आहे. नुकतेच संसदेच्या हिवाळी अधिवेशनात गदारोळ झाला. संसदेच्या सुरक्षेबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांनी सभागृहात विधान करावे, अशी मागणी काँग्रेससह विरोधी पक्ष करत होते. सभागृहाचा अवमान केल्याप्रकरणी 100 हून अधिक विरोधी खासदारांना निलंबित करण्यात आले.
खासदारांच्या निलंबनाचं सत्र
सभागृहाचा अवमान केल्याप्रकरणी 14 डिसेंबर रोजी विरोधी बाकांवरील 13 खासदार, 18 डिसेंबर रोदी 33 खासदार, 19 डिसेंबरला 49 आणि 20 डिसेंबरला दोन खासदारांना निलंबित करण्यात आले. त्याचवेळी 14 डिसेंबरला राज्यसभेतून 45 आणि 18 डिसेंबरला 45 खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं.
निलंबित खासदारांमध्ये अनेक महत्त्वाची नावे
लोकसभेत सभापतींचा अवमान केल्याप्रकरणी 49 विरोधी सदस्यांना मंगळवारी निलंबित करण्यात आले होते. याआधी सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात लोकसभेच्या 33 आणि राज्यसभेच्या 45 खासदारांना निलंबित करण्यात आले होते. निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये दानिश अली, प्रतिभा सिंह, दिनेशचंद्र यादव, शशी थरूर, सुप्रिया सुळे, डिंपल यादव आदींची नावे आहेत. त्याचवेळी निलंबित खासदारांनी सभागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन केले.
आता यामधील किती खासदार अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी सभागृहात उपस्थित राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोणत्या महत्त्वाच्या घोषणा केल्या जाणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. त्यामुळे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन देशाच्या दृष्टीने आणि आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचं मानलं जातंय.