Omicron Cases In India : देशात ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. गुरुवारी देशभरात 14 नव्या ओमायक्रॉनबाधित रुग्णांची भर पडली. यामध्ये कर्नाटकमधील पाच, राजधानी दिल्ली आणि तेलंगणामधील प्रत्येकी 4-4 आणि गुजरातमधील एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे देशातील ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 87 इतकी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे 32 रुग्ण आहेत. दिलासादायकबाब म्हणजे यामधील 25 रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे. देशातील ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याचं पाहून आज केंद्रीय गृह सचिवांना आढावा बैठक घेतली.  


दक्षिण आफ्रिका देशात उदयास आलेल्या ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा प्रसार जगभरात वेगाने होत आहे. हा विषाणू याआधीच्या सर्व विषाणूंपेक्षा अधिक जलदगतीने पसरत असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. पण या विषाणूची लक्षणं आधीच्या तुलनेत काहीशी सौम्य असली तरी याचा प्रसाराचा गती धोकादायक आहे.


राजधानी दिल्ली - 
दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी आतापर्यंत राज्यात ओमायक्रॉनचे दहा रुग्ण झाल्याची माहिती दिली. यामधील सर्व रुग्णांना सौम्य लक्षणं आहेत. कोणत्याही रुग्णाची प्रकृती चिंताजनक नाही. संसर्गातील 40 जणांना लोकनायक जय प्रकाश (एलएनजेपी) विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. 


कर्नाटक - 
कर्नाटकचे आरोग्य मंत्री डॉ. सुधाकर यांनी सांगितलं की, आज राज्यात पाच नव्या ओमायक्रॉन बाधित रुग्णाची भर पडली आहे. सर्व रुग्णांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेले आहेत. राज्यात आतापर्यंत 8 ओमायक्रॉनबाधित रुग्णाची नोंद झाली आहे.  


तेलंगाणा - 
तेलंगाणा आरोग्य विभागाने गुरुवारी राज्यात चार नवीन ओमायक्रॉन रुग्णाची भर पडल्याचं सांगितलं. यामध्ये तीन केनियामधून आलेल्या नागरिकाचा समावेश आहे.  


गुजरात - 
गुरुवारी गुजरातमधील 41 वर्षीय महिलेला ओमायक्रॉनची बाधा झाल्याचं रिपोर्टमधून स्पष्ट झालेय.  मेहसाणा जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी डॉ विष्णुभाई पटेल यांनी याला दुजोरा दिला आहे.  


महाराष्ट्रात 32 ओमायक्रॉनचे रुग्ण
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आत्तापर्यंत 32 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. या 32 ओमायक्रॉन बाधितांपैकी 25  रूग्णांचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळं या 25 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. ही काहीशी दिलाशाची बाब आहे. मात्र हा दिलासा कायम राहणार का हा प्रश्न आहे कारण ओमायक्रॉन व्हेरियंटवर आपल्या कोरोना लशी परिणाम कारक नसतील अशी भीती नीती आयोगाचे सदस्य डॉ व्ही के पॉल यांनी व्यक्त केलंय. सध्या देशात 53 कोरोना रुग्णांना ओमायक्रॉनचा संसर्ग झालाय. आणि हा प्रसार आणखी वेग पकडण्याची भीती आहे.


देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या - 
महाराष्ट्र- 32 
राजस्थान- 17
दिल्ली-10
कर्नाटक- 8 
तेलंगाणा- 7
केरळ- 5 
गुजरात- 5
पश्चिम बंगाल-1
आंध्र प्रदेश 1
चंडीगढ-1