Dholavira: जगप्रसिद्ध असलेल्या हडप्पा संस्कृतीतील एक प्रमुख अवशेष असलेल्या गुजरातमधील ढोलविराचा समावेश आता जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आला आहे. तशा प्रकारची घोषणा युनेस्कोने आपल्या जागतिक वारसा समितीच्या 44 व्या बैठकीत केली आहे. युनेस्कोच्या या निर्णयानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी आनंद व्यक्त केला आहे.
गुजरातमधील ढोलविराचा जागतिक वारसा यादीत सामावेश केल्याने आता भारतातील या यादीत असणाऱ्या स्थळांची संख्या 40 इतकी झाली आहे. तसेच या यादीत जागा मिळवणारे ढोलविरा आता चंपानेर, पाटनच्या राणी की बाव आणि अहमदाबाद नंतर गुजरातमधील चौथे स्थळ बनले आहे.
इसवी सन पूर्व 2500 वर्षांपूर्वी भारतात सिंधू नदीच्या काठी हडप्पा ही नागरी संस्कृती वसली होती. गुजरातमधील ढोलविरा हे ठिकाण हडप्पा संस्कृतीचाच भाग असून 1968 साली त्याचा शोध लागला. ढोलविरा म्हणजे हडप्पाकालीन पाण्याचे अप्रतिम नियोजन असलेले एक आदर्श ठिकाण म्हणून ओळखले जाते. तसेच या शहराला संरक्षणासाठी अनेक स्तरीय भिंती बांधण्यात आल्या होत्या. ढोलविरामधील बांधकामामध्ये दगडांचा वापर करण्यात आल्याचं दिसून येतंय, जे आपल्याला इतर हडप्पाकालीन ठिकाणी दिसत नाही. तसेच इथल्या प्रेतं पुरण्याच्या जागेचे बांधकाम हे आदर्श असेच होते.
ढोलविरामध्ये कॉपर, शेल, दगड, दागिने, टेराकोटा आणि प्राण्याच्या शिंगांचे अवशेष सापडले आहेत. या वस्तूंचा अभ्यास केल्यास हडप्पाकालीन संस्कृती किती समृद्ध होती याचा अंदाज येतो.
ढोलविरा हे गुजरातमधील कच्छ या जिल्ह्यात वसलेलं आहे. आतापासून विचार केला तर हे ठिकाण जवळपास 4500 वर्षांपूर्वीचे असून या ठिकाणाचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश व्हावा म्हणून केंद्र सरकारने 2014 सालापासून प्रयत्न सुरु केले होते.
ढोलविरा हे ठिकाण हडप्पाकालीन एक महत्वाचे नागरी ठिकाण असून ते आपल्याला आपल्या समृद्ध भूतकाळाशी जोडतं. विशेषत: ज्या लोकांना इतिहास, संस्कृती आणि पुरातत्वशास्त्राची आवड आहे अशांनी तर या ठिकाणी भेट द्यायलाच हवी असं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
तेलंगणातील रुद्रेश्वर (रामप्पा) मंदिराचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत केल्याची घोषणा रविवारी युनेस्कोने केली होती. आता त्यानंतर ढोलविराचा समावेश करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- 'शरद पवार विरोधी पक्षाचे भीष्म पितामह, ममता बॅनर्जी राष्ट्रीय राजकारणाचं आकर्षण' : संजय राऊत
- World Hepatitis Day 2021 : दरवर्षी लाखो लोकांचा बळी घेणारा हिपॅटायटिस रोग काय आहे? जाणून घ्या सर्वकाही
- IND vs SL 2nd T20: टीम इंडिया अडचणीत, 9 खेळाडू आयसोलेशनमध्ये, आज दुसरा टी20 सामना, 'या' खेळाडूंचं पदार्पण होणार