मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला आफ्रिकेतील सेनेगलमध्ये अटक करण्यात आली आहे. भारतीय यंत्रणांनी दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी ही कारवाई केल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. रवी पुजारीला 22 जानेवारीला अटक केल्यानंतर 26 जानेवारीला भारतीय दूतावासाला अटकेबाबतची माहिती मिळाली.


त्यानंतर आता पुजारीला भारतात आणले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या अनेक दशकापासून फरार असलेल्या रवी पुजारीवर खंडणी, अपहरण, खून, ब्लॅकमेलिंग आणि फसवणुकीचे आरोप आहेत. त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली आहे.

भारतीय गुप्तचर यंत्रणा रवी पुजारीवर मागील काही दिवसांपासून लक्ष ठेवून होती. अखेर त्याला अटक करण्यात आली आहे. नुकतेच ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणातील आरोपी राजीव सक्सेना आणि मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी दिपक तलवार यांना भारतात आणण्यात आलं आहे. दोघांनाही ईडीने ताब्यात घेतले आहे.

कोण आहे रवी पुजारी ?

रवी पुजारी हा 90च्या दशकात मुंबईत सक्रिय होता. तो कुख्यात डॉन छोटा राजनसाठी काम करायचा. मात्र 2001 साली तो छोटा राजनच्या गँगमधून बाहेर पडला. मुंबईतील गँग्स विरोधात पोलिसांनी कारवाई सुरु केल्यानंतर त्यांने मुंबईतून पलायन केलं होतं. त्याच्यावर खंडणी, अपहरण, खून, ब्लॅकमेलिंग आणि फसवणुकीचे आरोप आहेत. त्याने नुकतंच जेएनयूचा विद्यार्थी उमर खालिदला फोनवर जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याच्यावर बॉलिवूड सेलिब्रेटींकडून खंडणी मागिल्याचाही आरोप आहे. तो मागील काही दिवसांपासून ऑस्ट्रेलियामध्ये असल्याची माहिती होती.