नवी दिल्ली : बंदी घालण्यात आलेली नक्षलवादी संघटना ULFA(I) उल्फाच्या काही शिबीरांवर भारतीय सैन्य दलाने हल्ला केल्याचा दावा उल्फाकडून करण्यात आला आहे. म्यानमार (Myanmar) येथील संघटनेच्या कॅम्पवर भारतीय सैन्य दलाने (Indian army) ड्रोन हल्ले केले असून या हल्ल्यात संघटनेचा एक नेता मृत्यूमुखी पडला असून 19 जण जखमी झाल्याचा दावाही संघटनेच्यावती अधिकृतपणे दिलेल्या माहितीत करण्यात आलाय. मात्र, भारतीय सैन्य दलाकडून हा दावा फेटाळण्यात आला आहे.
भारतीय सैन्य दलाच्या प्रवक्त्यांनी पीटीआयशी बोलताना हा दावा फेटाळला. लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत यांनी म्हटले की, अशाप्रकारच्या कुठल्याही हल्ल्याची आम्हाला माहिती नाही. भारतीय सैन्य दलाने अशाप्रकारचे कुठलेही ऑपरेशन केलं नाही, याची माहिती नाही. मात्र, उल्फा संघटनेनं ड्रोन हल्ल्यात संघटनेतील वरिष्ठ नेता ठार झाला असून 19 जण जखमी झाल्याचा दावा केला आहे. उल्फाच्या दाव्यानुसार, या ड्रोन हल्ल्यात एनएससीएन च्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं आहे.
1979 मध्ये स्थापन झालेली ULFA(I) उल्फा
युनाइटेड लिब्रेशन फ्रंट ऑफ आसम ही सक्रीय आणि नक्षली कारवायांसाठी चर्चेत असलेली नक्षलवादी संघटना आहे. सन 1979 मध्ये ही संघटना स्थापन करण्यात आली होती. परेश बरुआ यांनी आपल्या बंडखोर साथीदारांसमवेत एकत्र येत संघटनेची स्थापन केली. सशस्त्र संघर्षाच्या माध्यमातून आसामध्ये स्वतंत्र सत्तास्थापन आणि स्वयंभू राज्य करण्याचा उद्देश बाळगून परेश बरुआ यांनी हिंसावादी संघटनेचा पाया घातला. केंद्र सरकारने 1990 मध्ये या संघटनेच्या कारवाया लक्षात घेऊन संघटनेवर बंदी घातली आहे. तसेच, या संघटनेविरुद्ध भारतीय सैन्य दलाकडून ऑपरेशनही राबविण्यात आले आहे. 2008 मध्ये उल्फा संघटनेचा नेता अरबिंद राजखोवा यास बांग्लादेशमधून अटक करण्यात आली होती. त्यानंतर, त्याला भारताच्या ताब्यातही देण्यात आले. उल्फा संघटनेच्या उग्रवादी आणि हिंसात्मक कारवायांमुळे येथील चहा व्यापारियों एकदा आसाम राज्य सोडून बाहेर जाण्याचा निर्णय देखील घेतला होता.