Ujjwal Nikam On Santosh Deshmukh Case: ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपती कोट्यातून उज्ज्वल निकमांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत निकमांचा उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून पराभव झाला होता. भाजपमध्ये प्रवेश करत त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. यात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी त्यांचा पराभव केला. निकम यांच्यासोबतच सी. सदानंदन मस्ते, हर्षवर्धन श्रृंगला आणि डॉ. मीनाक्षी जैन यांनाही राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर संधी मिळाली आहे. 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेचे नामांकित सदस्य म्हणून चार प्रतिष्ठित व्यक्तींची नियुक्ती केली आहे. भारतीय संविधानाच्या कलम 80(1)(a) अंतर्गत या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये ज्येष्ठ सरकारी वकील उज्जवल निकम यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्राला हादरवणाऱ्या बीडमधील संतोष देशमुख प्रकरणी (Santosh Deshmukh Case) उज्जवल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र राज्यसभेवर नियुक्ती झाल्यानंतर ते विशेष वकील म्हणून काम पाहू शकणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. 

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची केस निकम लढत राहणार?

संतोष देशमुख प्रकरण उज्जवल निकम सरकारी वकील म्हणून लढत होते. त्यामुळे राज्यसभेवर निवड झाल्यामुळे ते यापुढेही या प्रकरणावर काम करतील की नाही याबद्दल चर्चा आहे. यातच एबीपी माझाशी बोलताना उज्जवल निकम यांनी याबाबत भाष्य केलं. राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झाल्यामुळे मी संतोष देशमुख प्रकरणावर विशेष सरकारी वकील म्हणून काम करु शकतो की नाही, यावर अभ्यास करेन. मी विशेष कायदेतज्ज्ञांसोबत बोलणार असं, उज्जवल निकम म्हणाले.

कसाबचा खटला लढवणारे उज्ज्वल निकम-

उज्ज्वल निकम देशातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित सरकारी वकिलांमध्ये गणले जातात. उज्ज्वल निकम यांनी 1993 चा मुंबई बॉम्बस्फोट, गुलशन कुमार खून खटला, प्रमोद महाजन खून, 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील अजमल कसाबचा खटला आणि 2016 च्या कोपर्डी बलात्कार खटल्यासारख्या अनेक हाय-प्रोफाइल प्रकरणांमध्ये खटल्याचे नेतृत्व केले आहे. उज्ज्वल निकम यांना 2016 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उज्जवल निकम यांना भारतातील न्यायव्यवस्थेच्या ताकदीचे प्रतीक मानले जाते.

उज्जवल निकम यांची राज्यसभेत वर्णी, VIDEO:

संबंधित बातमी:

Rajya Sabha Nomination: निकम, मस्ते, श्रृंगला अन् जैन; राष्ट्रपती कोट्यातून 4 जणांची राज्यसभेवर निवड, पाहा चारही जणांची A टू Z माहिती