नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना राज्यघटनेनं दिलेल्या अधिकारांचा वापर करुन राज्यसभेत चार सदस्यांची नेमणूक केली आहे. महाराष्ट्रातील उज्ज्वल निकम यांच्यासोबतच सी. सदानंदन मस्ते, हर्षवर्धन श्रृंगला आणि डॉ. मीनाक्षी जैन यांना राष्ट्रपतींनी नामनिर्देशित सदस्य म्हणून राज्यसभेत संधी दिली आहे. राष्ट्रपती एकूण 12 सदस्यांची राज्यसभेत नेमणूक करु शकतात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना राज्यघटनेकडून मिळालेल्या विशेषाधिकारांचा वापर करत या नियुक्त्या केल्या आहेत. भारतीय संविधानाच्या कलम 80 (1) (a) आणि खंड (3) चा वापर करत या व्यक्तींची राज्यसभेवर नियुक्ती केली आहे.
राष्ट्रपती नामनिर्देशित सदस्यांची निवड प्रक्रिया आणि अधिकार
भारताच्या राज्यसभेची सदस्यसंख्या 250 इतकी आहे. यामध्ये राष्ट्रपती एकूण 12 सदस्यांची नियुक्ती नामनिर्देशित पद्धतीनं करु शकतात. या सदस्यांमध्ये साहित्य, कला, विज्ञान आणि समाजसेवा या सारख्या क्षेत्रांचं विशेष ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असायला पाहिजे. राज्यसभेचं सदस्यत्व स्वीकारल्यानंतर नामनिर्देशित सदस्य सहा महिन्यात कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करु शकतात किंवा स्वतंत्र देखील राहू शकतात. या सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्ष असतो. राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह असल्यानं दर दोन वर्षांनी एक तृतियांश सदस्यांचा कार्यकाळ संपतो, त्यांच्या जागी नव्यानं सदस्यांची निवड होते.
संविधानाच्या कलम 249 अनुसार राज्यसभेत उपस्थित असलेल्या आणि मतदान प्रक्रियेत सहभागी सदस्यांना दोन तृतियांश बहुमतानं राज्य सूचीतील कोणत्याही विषयला राष्ट्रीय महत्त्वाचा विषय जाहीर करण्याचा अधिकार असतो. राज्यसभेत असा प्रस्ताव मान्य झाल्यास संसद त्यावर कायदा करु शकते. संविधानाच्या कलम 312 नुसार राज्यसभा दोन तृतियांश बहुमतानं प्रस्ताव मंजूर करुन केंद्र सरकारकडे पाठवून नव्या अखिल भारतीय सेवा स्थापन करण्याचा अधिकार देऊ शकते.
नामनिर्देशित खासदारांना पगार किती मिळतो?
राष्ट्रपती नामनिर्देशित सदस्यांना राज्यसभेच्या इत सदस्यांप्रमाणेच पगार आणि भत्ता मिळतो. 2025 मध्ये खासदारांचं मासिक वेतन 1.24 लाख रुपये आहे. याशिवाय त्यांना मतदारसंघ भत्ता, दैनिक भत्ता, कार्यालय भत्ता आणि इतर सुविधा मिळतात. याशिवाय कार्यालय देखबाल भत्ता, दैनिक भत्ता, निवासस्थान, वीज, पाणी, टेलीफोन आणि वैद्यकीय सेवा देखील मिळतात. प्रवास भत्ता देखील खासदारांना मिळतो. याशिवाय निवृत्तीनंतर 25000 रुपये पेन्शन मिळते. 5 वर्षांपेक्षा अधिक सेवेसाठी अतिरिक्त 2000 रुपये पेन्शन मिळते.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत उज्ज्वल निकम यांनी मुंबईतून भाजपच्या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवली होती. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी उज्ज्वल निकम यांनी पराभव केला होता.