सोलापूर : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे (Praniti shinde) यांनी अंतरवली सराटी येथे जाऊन त्यांची भेट घेतलीय. या भेटीनंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे या बाप-लेकीवर जोरदार तोफ डागली आहे. जरांगेची भेट घेण्यापूर्वी त्यांची मागणी काय याची माहिती तुम्हाला असतानाही तुम्ही भेटलात. तुमच्या बापाने 2004-05 दरम्यान एक परिपत्रक काढून कुणबी मराठा (Maratha) आणि मराठा कुणबी एकच समजावेत असा आदेश काढला होता. त्यामुळे ओबीसी उध्वस्त झाला आता तुम्ही बापाच्या पावलावर पाऊल ठेवत जरांगेला भेटायला गेलात, अशा शब्दात लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी प्रणिती शिंदेंच्या जरांगे भेटीवर जोरदार हल्लाबोल केला. 

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी शनिवारी अंतरवली सराटीमध्ये जाऊन भेट घेतली, त्यावेळी जरांगे यांनी प्रणिती शिंदेंचे स्वागत करत आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांना दिले. यापूर्वीच सर्व आमदार-खासदारांना अंतरवली सराटीमध्ये येण्याची विनंती मनोज जरांगे यांनी केली  होती. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे वर्षभरापासून आंदोलन करत असून 29 ऑगस्टच्या मुंबई आंदोलनापूर्वी आपल्या मागण्या सर्व आमदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी मनोज जरांगे यांनी आमदारांना अंतरवलीमध्ये येण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार, प्रणिती शिंदेंनी जरांगेंची भेट घेतली. त्यानंतर,ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार टीका केली आहे.  

ओबीसी मरो, तुमचं राजकारण जगो

प्रणिती शिंदे राजकारण करतायेत, खासदारकी भोगतायेत पण ते सोलापूर जिल्ह्यातील बहुसंख्या भटक्या विमुक्त जातीच्या जीवावर, यांच्या बापाने काढलेल्या एका जीआर मुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाची घटनात्मक चौकट उध्वस्त झाली होती, अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे. तुमच्या बापाने ओबीसी रक्षणाच्या नरडीचा घोट घेतला आणि तुम्ही त्याच बापाच्या पावलावर पाऊल ठेवत जातीयवादी मनोज जरांगे याला भेटायला गेलात. जरांगेच्या मागणीनुसार जर त्याच्या जातीला ओबीसीमधून आरक्षण दिले तर मूळ मागास असलेला गोरगरीब, ओबीसी समाज त्याच्या समाजाच्या स्पर्धेत टिकेल का? याची जाणीव तुम्हाला असायला हवी होती. पण, याचा विचार ना तुमच्या बापाने केला, ना तुम्ही करताय अशी जळजळीत टीका हाकेंनी या भेटीवर केली. जरांगेला भेटण्यापूर्वी जिल्ह्यातील गोरगरीब ओबीसी समाजाचा विचार तुम्ही करायला हवा होता. मात्र, ओबीसी मरो आणि तुमचे राजकारण जगो ही तुमची वृत्ती असेल तर येत्या लोकसभा निवडणुकीत तुमचा करेक्ट कार्यक्रम करणार, असेही लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा

पुण्यातील लोहगड किल्ल्याचा इतिहास काय, युनेस्कोच्या यादीत का? इतिहासकार संदीप तापकिरांनी दिली इतंभू माहिती