Ujjain Mahakal Temple Viral Video: मध्य प्रदेशातील उज्जैन येथील प्रसिद्ध महाकाल मंदिराचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये काही महिला मंदिराच्या गर्भगृहात जाण्यापूर्वी जीन्स आणि सलवार सूटवर साडी गुंडाळताना दिसत आहेत. मंदिराच्या नियमांना बगल देत मंदिरच्या गर्भगृहात दर्शन घेण्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी उज्जैनचे जिल्हाधिकारी आशिष सिंह यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. महाकाल मंदिराची परंपरा कोणलाही मोडू देणार नाही, असंही ते म्हणाले आहेत. याच दरम्यान महाकालेश्वर मंदिर समितीचे प्रशासक गणेशकुमार धाकड यांनी हा व्हिडीओ जुना असल्याचे सांगितले आहे.


महाकालेश्वर मंदिराच्या गर्भगृहात दर्शन घेण्याबाबत मंदिराचे स्वतःचे नियम आहेत. महाकाल मंदिराच्या गाभाऱ्यातील सर्वसामान्य भाविकांचे दर्शन बंद असल्यास 1500 रुपयांची पावती घेऊन बाबा महाकालच्या गर्भगृहात दर्शन घेतले जाऊ शकते. महाकाल मंदिर व्यवस्थापन समितीने यासाठी ड्रेस कोड अनिवार्य केला आहे. गर्भगृहात महिलांना साडी आणि पुरुषांना धोतर परिधान करावे लागते.


असं असलं तरी येथील हे नियम खूप वर्ष जुने आहेत. मात्र आता मंदिराच्या नियमांकडे दुर्लक्ष करून मंदिराची परंपरा मोडीत काढली जात आहे. महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या काही महिला भाविकांनी सलवार सूट आणि जीन्सवर साडी गुंडाळून महाकालाचे दर्शन घेतले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उज्जैनचे जिल्हाधिकारी आशिष सिंह यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात कोणी पुजारी आढळून आल्यास त्यांच्यावरही कडक कारवाई केली जाईल. महाकालेश्वर मंदिराची परंपरा प्रत्येक परिस्थितीत पाळली जाईल, असं ते म्हणाले आहेत.


व्हायरल व्हिडीओ  जुना आहे: मंदिर प्रशासक


दरम्यान महाकालेश्वर मंदिर समितीचे प्रशासक गणेश कुमार धाकड यांनी सांगितले की, व्हायरल होत असलेला व्हिडीओ जुना आहे. मात्र याबाबत अद्यापही तक्रारी येत आहेत. त्यांनी सांगितले की, महाकालेश्वर मंदिरातील नियमांची माहिती भाविकांना दिली जाते. असा प्रकार घडल्यास दोषींवर कडक कारवाई केली जाईल.