मुंबई: उदयपूरचा टेलर असलेल्या कन्हैयालालची हत्या करणाऱ्या आरोपींना आज न्यायालयाच्या परिसरातच वकील आणि लोकांकडून मारहाण झाली. त्यासंबंधीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या हत्या प्रकरणाचा तपास एनआयए करत असून चार आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यावेळी हा प्रकार घडला. 


उदयपूरमध्ये टेलरिंगचे काम करणाऱ्या कन्हैयालालची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे. नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्याप्रकरणी ही हत्या करण्यात आल्याचं नंतर स्पष्ट झालं. एनआयए आता या प्रकरणाचा तपास करत आहे. आज या आरोपींना सुनावणीसाठी आणण्यात येत असताना त्यांना त्या ठिकाणचे वकील आणि उपस्थित लोकांनी मारहाण केली. पोलिसांनी प्रसंगावधान साधून या चारही आरोपींनी गाडीत बसवलं. या चारही आरोपींना आता 12 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 


 







राजस्थानमधील टेलर कन्हैया लाल हत्येचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणा (National Investigation Agency -NIA) करणार आहे. या हत्येतील आरोपी असलेल्या दोघांचा एनआयएने चौकशी सुरू केली असून या हत्येमागे दहशतवादी गट कार्यरत आहेत का याचा तपास करण्यात येत आहे.


काय आहे प्रकरण?
सोमवारी उदयपूरच्या धनमंडी पोलीस स्टेशन परिसरात दोन जणांनी दुकानात घुसून कन्हैयालाल नावाच्या व्यक्तीचा गळा चिरून त्याचा खून केला. या घटनेनेतर कन्हैया याचा गळा चिरलेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला. त्यामुळे उदयपूरमधील वातावरण तापलं होत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आदेश येईपर्यंत उदयपूरच्या सात पोलीस ठाण्यांच्या परिसरात तात्काळ संचारबंदी लागू करण्यात आली असून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्हैया याची हत्या करण्यात आल्यानंतर आरोपींना राजसमंद जिल्ह्यातील भीम परिसरातून त्याब्यात घेण्यात आले. राजसमंदचे पोलीस अधीक्षक सुधीर चौधरी यांनी सांगितले की, दोन्ही आरोपी हेल्मेट घालून मोटारसायकलवरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते पण भीमा परिसरात नाकाबंदी दरम्यान त्यांना पकडले गेले.


एका व्हिडीओ क्लिपमध्ये कथित हल्लेखोर एका व्यक्तीचा शिरच्छेद करत असल्याचे सांगत असल्याचे ऐकू येते. त्यात नुपूर शर्मा यांचाही उल्लेख करण्यात आला आहे, ज्यांना प्रेषित मोहम्मद यांच्यावर टिप्पणी केल्याबद्दल भाजपमधून निलंबित करण्यात आले होते. कन्हैया याने नुपूर शर्मा यांची स्तुती करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्याचे बोलले जात आहे.


सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार, दोन्ही आरोपी दुपारी धनमंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कन्हैया याच्या दुकानात पोहोचले. त्यापैकी एकाने आपले नाव रियाज असे घेतले. त्याने स्वतःची एक ग्राहक म्हणून ओळख करून दिली आणि कपडे शिवायची असल्याचे सांगितले. त्यानंतर कन्हैया याने मापे घ्यायला सुरुवात केली. याचवेळी त्याने कन्हैयावर हल्ला केला. अन्य आरोपींनी मोबाईलवरून घटनेचा व्हिडीओ बनवला. या घटनेत कन्हैयाचा जागीच मृत्यू  झाला.