श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पूँछ आणि कृष्णा खोऱ्यात पाकिस्ताने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला. पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे दोन जवान शहीद झाले. शिवाय, या गोळीबारात एक नागरिकही जखमी झाला आहे.


भारतीय सैन्यातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, भारताकडूनही पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्यात आले. आता दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरु आहे.

कृष्णा खोरे सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात गुरुसेवक सिंह शहीद झाले. कृष्णा खोरे सेक्टरमध्ये पाकच्या दोन घुसखोऱ्या अयशस्वी ठरल्या.

पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून किमान चार ठिकाणी गोळीबार करण्यात आला. ज्यामध्ये जवान आणि सामान्य नागरिकांवर निशाणा साधला गेला.

गेल्या दोन आठवड्यात पाकिस्तानच्या गोळीबारात 9 जवान शहीद झाले. याशिवाय, आंतरराष्ट्रीय सीमा आणि लाईन ऑफ कंट्रोलवर क्रॉस बॉर्डर गोळीबारात 8 सामान्य नागरिकांचाही मृत्यू झाला.

पाकव्याप्त काश्मीरमधील भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून 60 हून अधिकवेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले. भारताने 29 सप्टेंबर रोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केलं होतं. यामध्ये भारताने पाकिस्तानच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त करत, 40-50 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.