एनडीटीव्हीवरील एक दिवसाची बंदी योग्यच : सुभाष चंद्रा
एबीपी माझा वेब टीम | 06 Nov 2016 03:12 PM (IST)
नवी दिल्ली : एनडीटीव्ही चॅनलवर घातलेली एका दिवसाची बंदी ही योग्यच असल्याचं मत झी समुहाचे अध्यक्ष सुभाष चंद्रा यांनी व्यक्त केलं आहे. ट्विटरद्वारे सुभाष चंद्रा यांनी एनडीटीव्हीवरील बंदीचं समर्थन केलं आहे. एनडीटीव्हीवर एका दिवसांची बंदी ही शिक्षा किरकोळ आहे. देशाच्या सुरक्षेशी खेळणाऱ्यांवर अजीवन बंदी घातली पाहिजे, अशा शब्दात सुभाष चंद्रा यांनी बंदीचं समर्थन केलं. एनडीटीव्हीने कोर्टात धाव घेतली तरी त्याचं कोर्ट समर्थन करणार नाही, असंही सुभाष चंद्रा म्हणाले. यूपीए सरकारच्या काळात 'झी'वर बंदी घालण्याची वेळ आली होती. तेव्हा एनडीटीव्हीसह सर्व जणांनी मौन बाळगलं. मात्र आज चूक गोष्टीला चूक म्हणाल्याने काही जण या परिस्थितीला आणीबाणी म्हणत आहेत, असं सुभाष चंद्रा म्हणाले. काय आहे प्रकरण? पठाणकोट हल्ल्यावेळी नियम मोडून कव्हरेज केल्याप्रकरणी एनडीटीव्ही इंडिया या हिंदी न्यूज चॅनलवर केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाने कारवाई केली आहे. दहशतवादी हल्ला सुरु असताना नियमाचा भंग करुन कव्हरेज केल्याप्रकरणी संपूर्ण एक दिवस चॅनल बंद ठेवण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रायलाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, एनडीटीव्ही इंडियाला 9 नोव्हेंबरला दुपारी एकपासून ते 10 नोव्हेंबर दुपारी एक वाजेपर्यंत आपलं प्रसारण बंद ठेवावं लागणार आहे. संबंधित बातम्या :