नवी दिल्ली : पाकिस्तानमधील भारतीय दूतावासात कार्यरत असलेले दोन अधिकारी आज सकाळपासून बेपत्ता आहेत. सकाळी ते काही कामानिमित्त बाहेर गेले होते पण परत आले नाही. यानंतर हाय कमिशनच्या अधिकाऱ्यांनी परराष्ट्र मंत्रालयाकडे संपर्क साधला. परराष्ट्र मंत्रालयाने तातडीने बेपत्ता झालेल्या दोन भारतीय अधिकाऱ्यांचा मुद्दा पाकिस्तानकडे उपस्थित केला आहे. मात्र पाकिस्तानकडून अद्याप स्पष्टीकरण आले नाही.


पाकिस्तानमधील इस्लाबाद येथे भारतीय दूतावास कार्यालयात हे दोन अधिकारी कार्यरत आहे. या संदर्भात एएनआयने देखील ट्वीट केले आहे.  काही दिवसांपूर्वीच भारतानं पाकिस्तानच्या हेरगिरीचा डाव दिल्लीत हाणून पाडला. पाकिस्तान हाय कमिशनमध्ये काम करणारे दोन कर्मचारी आयएसआयसाठी हेरगिरी करत असल्याचं कळल्यावर भारतानं हा डाव तातडीनं हाणून पाडला होता. भारतीय लष्कराच्या सामानांची वाहतूक नेमकी कशी होत असते याचा आराखडा गुप्त पद्धतीनं मिळवण्याचा प्रयत्न हे दोघे करत होते. पण हा प्लॅन उघडकीस आल्यानंतर त्यांना 24 तासांत भारत सोडण्याचे आदेश देत सरकारनं त्यांना हाकलून दिलं होतं.





तर भारतीय हाय कमिशनचे ज्येष्ठ अधिकारी गौरव अहलुवालिया यांचा दुचाकीवरून पाठलागही करण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आला होता. मार्च महिन्यापासूनच अनेक भारतीय अधिकाऱ्यांना पाकिस्ताननं असा विनाकारण त्रास द्यायला सुरुवात केली आहे. गेल्या दोन महिन्यांमध्येच अनेक वेळा असा प्रकार घडला आहे.


संबंधित बातम्या :



आयएसआय एजंटकडून भारतीय राजदूतांचा पाकिस्तानमध्ये पाठलाग