नवी दिल्ली : पाकिस्तानच्या कुरापती एरव्ही सीमेवर तर सुरु असतातच. पण आता हद्द पार करत त्यांनी डिप्लोमसीमधेही ही लढाई सुरु केली आहे. भारतीय हाय कमिशनचे ज्येष्ठ अधिकारी गौरव अहलुवालिया यांच्या कारचा पाठलाग करुन त्यांच्यावर पाळत ठेवण्यापर्यंत आयएसआयची मजल गेली आहे.
गौरव अहलुवालिया यांचा दुचाकीवरून पाठलागही करण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. एएनआयने यासंदर्भातील हा व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये गौरव अहलुवालिया यांच्या कारचा पाठलाग एक एजंट करत आहे पाकिस्तानच्या आयएसआय संघटनेचा उपद्व्याप आहे. इस्लामाबादमध्ये भारतीय हाय कमिशनचे प्रमुख सौरभ अहलुवालिया यांना सतावण्यासाठी पाकिस्ताननं हा नवा उद्योग सुरु केला आहे. या प्रकाराची तातडीनं दखल घेत भारतानं आपली नाराजी पाकिस्तानला कळवली आहे.
पाकिस्ताननं केलेली ही पहिली आगळीक नाही.मार्च महिन्यापासूनच अनेक भारतीय अधिकाऱ्यांना पाकिस्ताननं असा विनाकारण त्रास द्यायला सुरुवात केली आहे. गेल्या दोन महिन्यांमध्येच तब्बल 13 वेळा असा प्रकार घडला आहे. आता तर थेट हायकमिशनच्या प्रमुखांपर्यंतच ही मजल गेली.
मागच्या आठवड्यात भारतानं पाकिस्तानच्या हेरगिरीचा डाव दिल्लीत हाणून पाडला. पाकिस्तान हाय कमिशनमध्ये काम करणारे दोन कर्मचारी आयएसआयसाठी हेरगिरी करत असल्याचं कळल्यावर भारतानं हा डाव तातडीनं हाणून पाडला. मागच्याच आठवड्यातली घटना आहे. पाकिस्तानी हाय कमिशनमधल्या आबिद हुसेन आणि मोहम्मद ताहीर या दोन कर्मचाऱ्यांना भारतानं हेरगिरी करताना रंगेहाथ पकडलं. भारतीय लष्कराच्या सामानांची वाहतूक नेमकी कशी होत असते याचा आराखडा गुप्त पद्धतीनं मिळवण्याचा प्रयत्न हे दोघे करत होते. पण हा प्लॅन उघडकीस आल्यानंतर पुढच्या 24 तासांत भारत सोडण्याचे आदेश देत सरकारनं त्यांना हाकलून दिलं.
व्हिएन्ना करारानुसार भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी एकमेकांच्या दूतावासातल्या अधिकाऱ्यांचा योग्य तो सन्मान राखणं बंधनकारक आहे. पण आपली चोरी पकडली गेल्यानंतर पाकिस्तानकडून त्याचा राग उगीचच भलत्या पद्धतीनं काढला जातोय. पाकिस्तानच्या या आगळीकीला चोख उत्तर देण्यासाठी भारत आता नेमकं काय पाऊल उचलणार याची उत्सुकता आहे.