नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलच्या किमती दररोज वाढविण्याचा सपाटा सोमवारी सलग नवव्या दिवशीही सुरू ठेवला. ताज्या वाढीने पेट्रोल दर लिटरमागे 48 पैशांनी, तर डिझेल 59 पैशांनी अधिक महाग झाले.  दिल्लीत पेट्रोलचा दर 75.58 रुपयावरुन 76.26 रुपये लिटर आणि डिझेलचे दर 74.03 रुपयावरून 74.62 रुपयावर गेला आहे.


सुमारे 82 दिवसांनंतर कंपन्यांनी गेल्या रविवारपासून पुन्हा इंधनाचे दर रोज बदलणे सुरू केले. गेल्या नऊ दिवसांत केलेल्या वाढीमुळे पेट्रोलचा दर लिटरमागे 5 रुपयांनी, तर डिझेलचा दर 5.21 रुपयांनी वाढला आहे.


सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या असणाऱ्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमीटेडबरोबर हिंदुस्ताना पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडनेही 14 मार्चपासून इंधनाच्या दरांमध्ये रोज बदल करण्याचा निर्णय तात्पुरता मागे घेतला होता. त्यानंतर सरकारने 5 मे ला पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 10 रुपये आणि डिझेलवर 13 रुपये प्रतिलिटर वाढ केली. दोन पटीच्या या वाढीमुळे सरकारला दोन लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त कर महसूल मिळाला.


जगातील अनेक देशांमध्ये ‘लॉकडाऊन’ हळूहळू उठवून अर्थव्यवस्थेचा गाडा पुन्हा सुरू झाल्यावर मागणीही वाढत असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किमतीही वाढू लागल्या आहेत. देशातील इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय बाजाराशी निगडित असल्याने आणखी काही दिवस दरवाढ होऊ शकेल, असे तेल कंपन्यांमधील सूत्रांचे म्हणणे आहे.


Petrol Pump Self Service | पुण्यात 'आत्मनिर्भर' पेट्रोल पंप! तुमच्याच हाताना भरा इंधन