Twitter Account Banned : भारतातील (India) पाकिस्तानच्या (Pakistan) चार दूतावासांचे ट्विटर (Twitter) अकाउंट बंद करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दूतावासांवर त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून खोट्या बातम्या आणि अपप्रचार पसरवल्याचा आरोप आहे. भारत आणि अन्य काही दूतावासांच्या वतीनं अशी कारवाई केली जाऊ शकते, असं मानलं जात आहे.


त्याचवेळी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं ट्वीट केलं की, इराण, तुर्की, इजिप्त आणि संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानी दूतावासांच्या खात्यांवर कारवाई करून भारतातील ट्विटर बंद करण्यात आलं आहे. त्यांचं अकाउंट त्वरित पूर्ववत करावं, अशी विनंती त्यांनी केली.



यापूर्वीही अशाच प्रकारची कारवाई 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानच्या कोणत्याही ट्विटर अकाउंटवर कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही पाकिस्तानमधील राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारक रेडिओ पाकिस्तानचे खातं ट्विटरनं बंद केलं होतं.


ट्विटर अकाउंट्सवरुन भारताविरुद्ध द्वेष पसरवण्याचं काम 


पाकिस्तानचे ट्विटर अकाउंट ब्लॉक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही ट्विटरनं पाकिस्तानमधील राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारक रेडिओ पाकिस्तान हे खातं बंद केलं होत. पाकिस्तानी दूतावासांची ट्विटर अकाऊंट्स भारताविरुद्ध द्वेष भडकवत होती. नुकत्याच झालेल्या नुपूर शर्मांच्या वादग्रस्त वक्तव्या प्रकरणीही त्यांनी ट्वीट केलं होतं. भारतामध्ये द्वेष पसरवणाऱ्या इतर अनेक खात्यांवरही भारतानं बंदी घातली आहे.


यापूर्वी पाकिस्ताननं इस्लामिक देशांची संघटना असलेल्या ओआयसीच्या निमित्तानं नुपूर शर्मांच्या प्रेषित मोहम्मद पैगंबरावरील वक्तव्याचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात उपस्थित केला होता. यावर भारतानं चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानची बोलती बंद केली. भारतानं सांगितलं की, ते सहिष्णुतेच्या संस्कृतीला प्रोत्साहन देतं आणि सर्व धर्मांचा आदर करते. तसेच, भारत कोणत्याही धार्मिक अपमानाचा मुद्दा कायदेशीर चौकटीत हाताळतो.