Twin Towers Demolition : उत्तर प्रदेशमधील नोएडा (Noida) येथे अनधिकृतपणे बांधण्यात आलेले ट्विन टॉवर (Supertech Twin Towers) उद्या म्हणजे 28 ऑगस्ट रोजी पाडण्यात येणार आहेत. जमीनदोस्त होणारी देशातील ही पहिली उंच इमारत असणार आहे. कुतुबमिनारपेक्षा उंच असणारी ही इमारत तीन हजार 700 किलो वजनाच्या स्फोटकांच्या माध्यमातून पाडण्यात येणार आहे.
31 ऑगस्ट 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाने नोएडाच्या सेक्टर 93A मधील भारतातील सर्वात उंच बांधकाम नोएडा ट्विन टॉवर्स बेकायदेशीर घोषित केले. सुप्रीम कोर्टाच्या बेकायदेशीर ठरवण्याच्या आदेशानंतर तीन महिन्यांनी हा ट्विन टॉवर पाडण्यात येणार होता, मात्र आता वर्षभरानंतर 28 ऑगस्टला बेकायदेशीरपणे बांधलेला ट्विन टॉवर पाडण्यात येणार आहे.
नोएडा ट्विन टॉवरशी संबंधित गोष्टी
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 28 ऑगस्ट रोजी बेकायदा सुपरटेक ट्विन टॉवर पाडण्यात येणार आहेत. रविवारी दुपारी अडीच वाजता 40 मजली इमारत पाडण्यात येणार आहे.
ट्विन टॉवर्स पाडण्यासाठी 3500 किलोपेक्षा जास्त स्फोटके वापरण्यात येणार आहेत. रविवारी शहराच्या दिशेने ट्विन टॉवर्सभोवती एक किलोमीटरचे सर्कल तयार करून मोठ्या संख्येने पोलीस कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण करणार आहेत.
ट्विन टॉवर्सच्या आजूबाजूला बांधलेल्या रस्त्यांवर सर्वसामान्यांना प्रवेश दिला जाणार नाही. एवढेच नाही तर शहरात ठिकठिकाणी डायव्हर्जन करण्यात आले असून 5 रस्तेही पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत.
ट्विन टॉवर स्फोटाच्या दिवशी आरोग्य विभागही घटनास्थळी उपस्थित राहणार आहे. शहरातील मोठमोठ्या रुग्णालयांमध्ये सुरक्षित घरे बांधण्यात आली आहेत. जेपी हॉस्पिटल, रिअॅलिटी हॉस्पिटल आणि जिल्हा हॉस्पिटलमध्ये ही सुरक्षित गृहे तयार करण्यात आली आहेत.
रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्याची जबाबदारी डॉ. जयस लाल यांच्याकडे देण्यात आली असून जेपी हॉस्पिटलची जबाबदारी डॉ. चंदा यांच्याकडे देण्यात आली आहे.
ट्विन टॉवर्सचा स्फोट होण्यापूर्वी म्हणजेच 28 ऑगस्ट रोजी दोन्ही सोसायटीतील लोकांना सकाळी 7 वाजता घरे सोडावी लागणार आहेत.
ट्विन टॉवर पाडताना आजूबाजूच्या सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना त्यांच्या छतावर आणि बाल्कनीत जाण्याची परवानगी नाही. त्याचबरोबर 31 ऑगस्टपर्यंत ट्विन टॉवर्सच्या आजूबाजूचा परिसर नो फ्लाय झोन घोषित करण्यात आला असून, त्याचे कोणी उल्लंघन केल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
आजूबाजूच्या सोसायटीमधून सुमारे तीन हजार वाहने बाहेर काढली जातील .
ही इमारत ज्या दिशेने पाडायची आहे त्यानुसार स्फोटके बसवण्यात आली आहेत. Apex च्या पहिल्या गनपावडरचा स्फोट होईल जेव्हा सायनच्या 60 टक्के दारूगोळ्याचा स्फोट होईल. सायन टॉवर आधी पडेल, त्यानंतर काही सेकंदांनी एपेक्स टॉवर पडताना दिसेल. कंपन कमी व्हावे म्हणून एकापाठोपाठ एक या इमारीत पाडल्या जाणार आहेत. सर्व गनपावडरचा स्फोट होण्यासाठी 9 सेकंद आणि इमारत खाली पडण्यासाठी चार सेकंद लागतील. 12 ते 13 सेकंदात, ही इमारत पूर्णपणे खाली पडेल.
एडिफाय इंजिनीअरिंगला हे ट्विन टॉवर्स पाडण्याचे काम देण्यात आले आहे. हे ट्विन टॉवर (Twin Tower) पाडण्यासाठी 46 जणांची टीम काम करत आहे. ही टीम दररोज सुमारे 12 तास स्फोटकं लावण्याचं काम करत आहे. स्फोटकांच्या मदतीनं अवघ्या तीन मिनिटांत एपेक्स आणि सायन नावाचे हे दोन टॉवर जमीनदोस्त होतील.
32 मजली टॉवर्स पाडल्यानंतर 30 मीटर उंचीपर्यंत याचा ढिगारा तयार होईल. हे टॉवर्स पाडल्यानंतर परिसरात शेकडो मीटरपर्यंत धूळ पसरेल. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिओ फायबर शीट्स बसवण्यात आल्या आहेत. याशिवाय झाडांच्या सुरक्षेसाठी त्यांना काळ्या पांढऱ्या हिरव्या चादरीनं झाकण्यात आलं आहे.