नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये छुप्या कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांनी आता एक नवाच मार्ग शोधला आहे. काश्मीरमध्ये पहिल्यांदाच ड्रोनच्या माध्यमातून अतिरेकी हल्ल्याचा प्रयत्न झालाय. गेल्या 24 तासांत अशा दोन घटना घडल्यानं सुरक्षायंत्रणांची चिंता वाढलीय. या प्रकरणाचा तपास तातडीनं एनआयएकडे सोपवण्यात आलाय. शिवाय भारतानं हा मुद्दा संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावरही उपस्थित केलाय. 


काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी हल्ल्याचा नवा पॅटर्न शोधलाय का? ड्रोनच्या माध्यमातून हवेतूनच स्फोटकं फेकली जातायत का? जम्मूमध्ये गेल्या 24 तासातच लागोपाठ दोन ड्रोन हल्ल्यांनी या प्रश्नांची गांभीर्यानं चर्चा सुरु झालीय. रविवारी रात्री कालचूक लष्करी तळ आणि काल पुन्हा सुंजवानमधल्या एअरफोर्स स्टेशनजवळ ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झालाय. सुरक्षा जवानांच्या सतर्कतेनं मोठी हानी टळली असली तरी हा नवा पॅटर्न सुरक्षायंत्रणांसाठी एक आव्हान बनला आहे. 


काश्मीरमध्ये झालेला हा पहिला ड्रोन हल्ला आहे. पहाटे तीन साडेतीनच्या सुमारास झालेल्या या हल्ल्यात दोन जवान जखमीही झाले. या ड्रोन हल्ल्यात अधिक विध्वंसक स्फोटकांचा वापर झाल्याची सूत्रांची माहिती आहे. हे RDX किंवा TNT असू शकतं. सीमेपलीकडूनच या ड्रोनची हालचाल नियंत्रित केली जात होती असाही दावा केला जातोय. एअरफोर्स तळाचं लोकेशन गुगल अर्थवरही सापडतं त्यामुळे प्रत्यक्ष रेकीचीही गरज उरत नाही. 


जम्मूमध्ये ज्या हवाई तळाजवळ हा ड्रोन हल्ला झाला तिथून आंतरराष्ट्रीय सीमा अवघ्या 14 किलोमीटर अंतरावर आहे. ड्रोन नेमके कुठून आले याचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेतला जातोय. पण हे सगळे सीसीटीव्ही लष्करी तळावरच्या रस्त्यावरच आहेत. सीमेवर सध्या जी रडार यंत्रणा आहे
 ती ड्रोनची हालचाल टिपू शकत नाही. पक्षासारख्या आकारात सीमेत घुसणारे हे ड्रोन टिपण्यासाठी वेगळी रडार यंत्रणा बसवावी लागेल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 


शस्त्रांची तस्करी, गुप्तचर यंत्रणांच्या कामासाठी आणि निर्धारित लक्ष्य उडवण्यासाठी ड्रोनचा वापर दहशतवाद्यांनी करणं हे संपूर्ण जगासाठीच धोकादायक आहे. सर्वच देशांनी अशा वापरावर गांभीर्यानं पावलं उचलत एकमेकांना सहाय्य करण्याची गरज आहे, अंतर्गत सुरक्षा विशेष सचिव व्ही एस कौमुदी यांनी म्हटलं. 


लष्करी तळावर गस्त घालणाया जवानांनी ड्रोनच्या दिशेनं गोळीबार केल्यानंतर अंधाराचा फायदा घेऊन हे ड्रोन गायब झाले. अवघ्या 24 तासांत दोन घटना घडल्यानं प्रकरणाचं गांभीर्य वाढलंय. केंद्र सरकारनं तातडीनं या प्रकरणाचा तपास एनआयएकडे दिलाय. शिवाय दिल्लीत एक महत्वाची उच्चस्तरीय बैठकही बोलावली गेलीय. 


या ड्रोन हल्ल्यामागे लष्कर ए तयब्बाचा हात असल्याचा प्राथमिक संशय आहे. एनआयएला तांत्रिकदृष्ट्याही अनेक बाबींचा तपास यात करावा लागणार आहे. रेडिओ फ्रीक्वेन्सीच्या द्वारे ड्रोन ऑपरेट केले जातात. शिवाय अशा हल्ल्यांमध्ये पाकिस्तानला आपल्या सहभागाबबतही हात झटकणं सोपं जातं. त्याचमुळे आता या ड्रोन हल्ल्यांवर जालीम उपाय शोधणं भारतीय यंत्रणांना आवश्यक बनलं आहे.