कानपूर : भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा अखेरचा दिवस आहे. कानपूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रपती कोविंद यांनी आपल्या पगाराचा उल्लेख केला. ते म्हणाले की, "मला दर महिना पाच लाख रुपये पगार मिळतो, त्यापैकी पाऊणे तीन लाख रुपये कर भरतो. आमच्यापेक्षा जास्त बचत एका शिक्षकाची होते." 


राष्ट्रपती रामनाथ कोविंद पहिल्यांदा रेल्वे मार्गाने पत्नीसोबत कानपूरच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यामुळे या दौऱ्याची जोरदार चर्चा आहे. भारतात सर्वाधिक वेतन मिळणारी व्यक्ती ही राष्ट्रपती असते असं सांगितलं. आपल्याला दर महिन्याला पाच लाख रुपये वेतन मिळतं, त्यापैकी मी 2.47 लाख रुपये कर भरतो, असं त्यांनी या दौऱ्यात सांगितलं.


आयकर जाणकार काय म्हणतात?
आयकर व्यावसायिक अमितकुमार पादल यांच्या माहितीनुसार, "भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय व राज्यमंत्री, खासदार आणि आमदार हेदेखील आयकरांच्या कक्षेत येतात पण पगारातून मिळणारं उत्पन्न म्हणून हा कर त्यांच्यावर आकारला जात नाही. आयकर कायद्याच्या कलमांतर्गत देय आणि प्राप्तकर्ता यांच्यात नियोक्ता-कर्मचारी संबंध असावेत
परंतु राष्ट्रपती, पंतप्रधान, खासदार आणि आमदार यांची निवड जनतेतून होत असल्याने त्यांचं सरकारसोबतचं नातं नियोक्ता-कर्मचारी असं नसतं. त्यांची नेमणूक सरकार करत नाही. म्हणूनच, हे लोक इतर स्त्रोतांकडून प्राप्त झालेल्या मुख्य मुदतीखाली आपला आयकर जमा करतात."


राष्ट्रपतींच्या वक्तव्यावर सोशल मीडियावर प्रतिक्रिया
राष्ट्रपतींच्या या वक्तव्यावर आता लोकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या वक्तव्यावर काहींनी प्रश्न उपस्थित केले आहेत. राष्ट्रपतींनाही कर द्यावा लागतो का? असा प्रश्न एकाने विचारला आहे. तर एका ट्विटर युझरने कमेंट केली आहे की, माझ्या वाचनात आलं आहे त्यानुसार राष्ट्रपतींचा पगार तसंच भत्ता करमुक्त असतो. तर आणखी एका युझरने लिहिलं आहे की, "भारतीय कायद्याने महामहिम राष्ट्रपतींना आयकरातून सूट दिली आहे. आता राष्ट्रपती प्रति महिना पाऊणे तीन लाख रुपये कर कोणाला देत आहेत, हे देशाला समजायला हवं."


'बचतीसाठी राष्ट्रपती बनले?' 
आणखी एका युझरने राष्ट्रपतींच्या वक्तव्यावर म्हटलं आहे की, "माननीय रामनाथ कोविंद बचतीसाठी राष्ट्रपती बनले का? भारतासारख्या मोठी लोकशाही असलेल्या देशाच्या राष्ट्रपतींना किती वेतन मिळतो आणि किती बचत होते हे महत्त्वाचं आहे का? एका राष्ट्रपतींवर होणारा एकूण वार्षिक खर्च ही मोठी रक्कम असते.