त्यामुळे नोटाबंदीनंतर चेकच्या माध्यमातून पेमेंट करणे अनेकांची डोकेदुखी झाली आहे. एकीकडे आर्थिक व्यवहारासाठी चेक हे सर्वात सुरक्षित माध्यम मानले जाते, पण या व्हिडीओमुळे तुमच्याच चेकवरुनच तुमच्या अकाऊंटवर दरोडा घातला जाण्याची भिती अनेकांना वाटत आहे. या व्हिडीओत दावा केल्याप्रमाणे एखादे पेन अशाप्रकारे चेकवरील अक्षरे आणि आकडे नष्ट करु शकतात का? असा प्रश्न यातून उपस्थित होत आहेत.
व्हॉटसअॅपवर व्हायरल होणाऱ्या चार मिनीटाच्या या व्हिडीओने अनेकांची झोप उडवली आहे. कारण असा काहीसा प्रकार, दुर्घटना आपल्यासोबतही घडू शकेल, याचीच चिंता अनेकांना सतावत आहे.
आम्ही याला जाणूनबुजून दुर्घटना हा शब्द वापरत आहोत. कारण तुमच्याच चेकच्या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीला कितीही मोठी रक्कम दिली जाऊ शकते, असा दावा या व्हिडीओमधून करण्यात येत आहे.
वास्तविक, या व्हिडीओमधील संबंधित व्यक्ती एका चेकवरील पाच हजार रुपयांचे अक्षरे सहज नष्ट करताना दिसत आहे. या चेकवर 16 फेब्रुवारी 2016 तारीख असल्याचेही या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. यानंतर ही व्यक्ती त्या चेकवरील इंग्रजीत लिहलेले पाच हजारांचे शब्द एका पेनने नष्ट करते. यानंतर १५ सेकंदातच या चेकवरील पाच हजार रुपये लिहलेले शब्द गायब झाल्याचे दिसतात. पुन्हा ती व्यक्ती त्याच पेनच्या सहाय्याने पाच हजाराचे आकड्यांसमोरील चिन्ह नष्ट करते, जेणेकरुन चेकवरील रक्कम वाढवता येईल. यानंतर जिथे पाच हजार अक्षरी लिहले होते, तिथे पन्नास हजार इंग्रजीत लिहून पाच हजाराचे आकड्यांच्या जागी 50 हजार रुपये लिहतो. हा सर्व प्रकार ३० सेकंदात घडतो.
या पेनच्या माध्यमातून चेकवरील अक्षरे आणि आकडे नष्ट करताना, केवळ साध्या पेनेची शाईच नष्ट होते. चेकवरील लाईन, आणि प्रिंट असलेले इतर शब्द नष्ट होत नाहीत. त्यामुळे चेकमधील ही हेरफार सर्वसामान्यांना पकडणे अतिशय अवघड आहे. तेव्हा जर हे खरंच असेल तर हा ब्लँक चेकचाच प्रकार आहे. कारण यामाध्यमातून केवळ चेकवरील रक्कमच नव्हे, तर नावही बदलून तुमचे बँक खाते सहज रिकामे होऊ शकते.
त्यामुळे असा कोणता पेन खरंच अस्तित्वात आहे का? यामगचे सत्य काय आहे हे समोर येणे गरजेचे आहे. एबीपी न्यूजने व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओचे सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या व्हायरल व्हिडीओची पडताळणी करण्यासाठी एबीपी न्यूजच्या प्रतिनिधी अंजली सिंह यांनी बाजारात असा कोणता पेन उपलब्ध आहे का? याचा शोध घेतला. यावेळी अंजली यांना पेन मिळाला नसला, तरी अशाप्रकारची एक पेन्सिल मिळाली. या पेन्सिलच्या माध्यमातून चेकवर लिहलेली अक्षरे आणि आकडे नष्ट करता येत होती.
व्हायर व्हिडीओतील पेन आणि अंजली यांना मिळालेल्या पेन्सिलची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी फॉरेन्सिक केमिस्ट्रीतील तज्ज्ञ डॉक्टर एस. के. शुक्ला यांच्याशी संपर्क सांधला. यावेळी त्यांना अशाप्रकारचा पेन असू शकतो का? असा प्रश्न विचारला. तेव्हा, त्या व्हायरल व्हिडीओमध्ये जो पेन दाखवण्यात येत आहे, तो पेन वास्तवात चेकवरील शाई नव्हे, तर त्याचा रंग नष्ट करत असल्याचे त्यांनी सांगितले. ज्यामुळे आपण लिहलेली रक्कम पाहू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.
व्हायरल व्हिडीओमधील पेनच्या शाईत एक असे केमिकल वापरले आहे, ज्यामुळे लिहलेली अक्षरे सहज नष्ट करता येतात, असे आपल्याला जाणवते.
विशेष म्हणजे, अशाप्रकारच्या पेनची शाई रेग्यूलर पेनेपेक्षा वेगळी असल्याची माहिती त्यांनी दिली. म्हणजे, एकीकडे ते तुमच्याकडून चेक लिहून घेतील, आणि त्यावरील अक्षरे नष्ट करुन आपल्याला हवी तशी रक्कम टाकून तुमचे खाते रिकामे करतील. त्यामुळे चेकवर सही करताना दुसऱ्याचा पेन वापरताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहेच.