मुंबई : डिजिटल पेमेंटसाठी केंद्र सरकारकडून अनेक नवनवीन योजना आणल्या जात आहेत. त्यातच कॅशलेस इकॉनॉमीच्या दृष्टीने आज एक मोठं पाऊल उचललं जाणार आहे. सरकारकडून आज एक नवं मोबाईल अॅप लाँच केलं जाईल, ज्याद्वारे कुठेही केवळ अंगठा लावून पेमेंट करता येईल.

या अॅपच्या वापरासाठी ग्राहक म्हणून कोणताही फोन वापरण्याची गरज नाही. केवळ तुमचा आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला असणं गरजेचं आहे. शिवाय दुकानदाराकडे स्मार्टफोन आणि बायोमेट्रिक मशिन असणं गरजेचं आहे. मात्र फिंगरप्रिंट स्कॅनरचा मोबाईल असेल तर बायोमेट्रिकचीही गरज नाही.

कसं असेल अप?

या नव्या अॅपला यूआयडी, आयडीएफसी बँक आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच एनपीसीआयने विकसित केलं आहे.

हे अॅप वापरासाठी दुकानदार आणि ग्राहकाला आपल्या स्मार्टफोनवर डाऊनलोड करणं गरजेचं असून, गूगल प्ले स्टोअरवर हे अॅप उपलब्ध असेल.

या अॅपच्या वापरासाठी तुमचा आधार नंबर आणि बँकेचं नाव अॅपमध्ये नोंद करणं गरजेचं असेल.

यानंतर मोबाईल हँडसेटच्या बायोमॅट्रिक स्कॅनरच्या माध्यमातून आपला अंगठा स्कॅन करावा.

तुमच्या अंगठ्याचा ठसाच तुमची ओळख असेल आणि या माध्यमातूनच तुम्ही तुमचे व्यवहार करु शकाल.

विशेष म्हणजे, यासाठी तुमच्याकडून सध्या कोणतेही अतिरिक्त शुल्क घेतले जाणार नाही.

अॅपची वैशिष्ट्ये

या अॅपमुळे आता डिजिटल पेमेंटसाठी क्रेडिट, डेबिट कार्डची किंवा ई-वॉलेटची आवश्यकता नसेल. एवढंच नाही तर ग्राहक म्हणून तुमच्याकडे स्मार्टफोन नसेल तरीही चालेल. शिवाय कसलाही पिन किंवा ओळख क्रमांक टाकण्याची गरज नसेल.

यूआयडी या आधार कार्ड देणाऱ्या संस्थेच्या आकडेवारीनुसार देशात जवळपास सर्व तरुणांकडं आधार कार्ड आहे. यापैकी 40 कोटी आधार कार्ड बँक खात्यांशी जोडलेले आहेत. त्यामुळे आधार कार्ड पेमेंटला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

अॅप लाँच झाल्याच्या काही दिवसात जवळपास 3 कोटी दुकानदार या अॅपचा वापर करतील आणि 25 ते 30 कोटी ग्राहकांना याचा फायदा होईल, असा यूआयडीचा अंदाज आहे.

देशात आतापर्यंत जारी करण्यात आलेल्या 94 कोटी डेबिट कार्डपैकी 74 कोटी कार्ड वापरात आहेत. मात्र यातही 10 पैकी 9 डेबिट कार्डचा वापर केवळ एटीएममधून पैसे काढण्यासाठी किंवा खात्याचा तपशील पाहण्यासाठी केला जातो.

स्वाईप मशिनची कमी, सेवा कर आणि सिक्युरीटीच्या धोक्यामुळे ग्राहक डेबिट कार्ड पेमेंट करणं टाळतात. त्यामुळे आधार कार्ड पेमेंट अॅप या सर्वांसाठी क्रांतीकारी पाऊल ठरेल, असं यूआयडीचं म्हणणं आहे.

आधार कार्ड बँक खात्याशी लिंक कसं कराल?

आधार कार्डद्वारे पेमेंट करण्यासाठी तुमचा आधार क्रमांक तुमच्या बँक खात्याशी जोडलेला असणं गरजेचं आहे. आधार कार्ड बँक खात्याशी जोडण्याचे चार मार्ग आहेत. सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुम्ही नेट बँकिंगचा वापर करुन तुमचा आधार क्रमांक बँक खात्याशी कनेक्ट करु शकता.

तुमच्या बँकेच्या कुठल्याही शाखेमध्ये जाऊन तुम्ही आधार कार्ड खात्याशी कनेक्ट करु शकता.

यापेक्षाही सोपा मार्ग म्हणजे एटीएमद्वारेही आधार कार्ड बँक खात्याशी कनेक्ट करता येतो.

या तीन पैकी एकही पर्याय न वापरता आल्यास संबंधित बँकेच्या कस्टमर केअरला फोन करुनही आधार कार्ड बँक खात्याशी कनेक्ट करता येतो.

आधार कार्ड कसं मिळवाल?

तुमचं आधार कार्ड हरवलं असेल किंवा नोंदणी करुन अजून मिळालं नसेल तर 1947 या क्रमांकावर फोन करुन त्याची माहिती मिळवू शकता. त्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड नोंदणी करताना दिलेला एनरोलमेंट आयडी क्रमांक असणं गरजेचं आहे. याच क्रमांकावर फोन करुन तुम्ही तुमच्या जवळचं आधार नोंदणी केंद्रही माहित करुन घेऊ शकता.

यूआयडीच्या वेबसाईटला एनरोलमेंट आयडीसह भेट देणं हा हरवलेलं आधार कार्ड मिळवण्याचा सोप पर्याय आहे. वेबसाईटवर तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक रजिस्टर करु शकता, हरवलेल्या कार्डची प्रिंट मिळवू शकता किंवा नावामध्ये काही बदल असतील ते देखील करु शकता.