मुंबई : सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एका तीन वर्षांच्या मुलीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. व्हिडीओत मुलीची आई तिला ओरडत आणि मारत पाढे शिकवत आहे. तर मुलगी घाबरलेली आणि रडताना दिसत आहे. हा व्हिडीओ क्रिकेटर विराट कोहली, शिखर धवन आणि युवराज सिंह यांनी शेअर करत आईच्या शिकवण्याच्या पद्धतीवर जोरदार टीका केली. पालकांनी मुलांना प्रेमाने शिकवण्याचं आवाहन त्यांनी केलं.


मात्र व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या या मुलीचं बॉलिवूड कनेक्शन आहे. ही चिमुकली गायक-संगीतकार तोशी आणि शारीब साबरीची भाची आहे. हया असं या मुलीचं नाव असून ती तोशीच्या बहिणीची मुलगी आहे.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महिलेवर जोरदार टीका झाली होती. परंतु आता या दोघांनी व्हिडीओसंदर्भात भाष्य केलं आहे. एका मिनिटाच्या क्लिपवरुन मुलीच्या आईबद्दल मत बनवण्याचा अधिकार कोणालाही नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

तोशी म्हणाला की, "माझ्या बहिणीने (हयाची आई) हयाला शिकवताना हा व्हिडीओ रेकॉर्ड केला. फॅमिलीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर हा व्हिडीओ पाठवून हया किती खट्याळ आणि मस्तीखोर झालीय हे सांगता येईल, असा उद्देश या व्हिडीओमागचा होता.


विराट कोहली आणि शिखर धवन यांना आमच्याबद्दल काही माहित नाही. आमचं मूल कसं आहे, हे आम्हाला माहित आहे ना. तिचा स्वभावच तसा आहे. पुढच्याच क्षणात ती खेळायला निघून जाते. जर तुम्ही तिला सोडलं तर ती म्हणणार की मी थट्टा करत होते. तिच्या स्वभावामुळे तिला सूट दिली तर की अभ्यासही करु शकणार नाही.

हया अतिशय हट्टी आणि कुटुंबाची लाडकी आहे. पण तिचा हट्ट आणि आमच्या लाडामुळे तिला सूट दिली तर ती अभ्यास कसा करणार? जेव्हा अभ्यासाचा मुद्दा असतो तेव्हा कधीतरी मुलांच्या नखऱ्यांकडे दुर्लक्ष केलेलं बरं, असंही तोशी साबरी म्हणाला.

तोशी साबरी पुढे म्हणतो की, "तिचं रडणं हे त्या क्षणापुरचं असतं, जेणेकरुन आई शिकवणं थांबवून तिला खेळण्यासाठी सोडेल. छोटी मुलगी आहे, अडीच-तीन वर्षांची. हा काही मोठा मुद्दा नाही. प्रत्येक घरात मुलांचा वेगळा हट्ट असतो, विविध स्वभावाची मुलं असतात. ही मुलगी फारच हट्टी आहे, पण आमची लाडकी आहे."



"त्यामुळे एक व्हिडीओ क्लिप पाहून कोणीही निष्कर्षापर्यंत येऊ नये. एका आईचं प्रेम आहे, ते आपण जज करु शकत नाही. तिला 9 महिने गर्भात वाढवलं आहे. जर एखाद्या मुलाने हट्ट केला तर त्या शिकवणं सोडून द्यायचं का? मुलांना सांभाळणं सोपं काम नाही. माझं लग्न झालंय आणि मलाही एक मुलगा आहे. मला माहित आहे की मुलांना सांभाळणं किती कठीण असतं. पालकांना एकाच वेळी मुलं आणि घर अशी दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागते."