वॉशिग्टन: अमेरिकन अध्यक्षीय डिबेटमध्ये हवामान बदलावर बोलताना अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टीका करत भारतातील हवा ही अत्यंत खराब असल्याचं म्हटलं आहे. या प्रश्नावरुन त्यांनी चीन आणि रशियावरही हल्ला केला. प्रतिस्पर्धी ज्यो बायडेन यांच्याशी केलेल्या शेवटच्या अध्यक्षीय डिबेटमध्ये बोलताना ट्रम्प म्हणाले की, चीनमध्ये पाहा किती प्रदूषण आहे, रशियामध्ये पहा, भारताचेही उदाहरण घ्या. तिथे हवा किती खराब आहे. तसे अमेरिकेत नाही. अमेरिकेत हवा किती स्वच्छ आहे, पाणी किती शुद्ध आहे. अमेरिकेत कार्बन उत्सर्जनावर किती चांगले उपाय अवलंबले आहेत, असं ट्रम्प म्हणाले.
ते पुढे म्हणाले की चीन, भारत आणि रशिया यासारखे देश हे जागतिक प्रदूषणाच्या विषयावर गंभीर नाहीत. वातावरण बदलाच्या प्रश्नावर अमेरिकेने आतापर्यंत अब्जावधी डॉलर्स खर्च केलेत पण त्याचा आपल्या देशाला फायदा न होता तोटाच होत होता. त्यामुळे अमेरिका पॅरिस करारातून बाहेर पडली.
वातावरण बदलाच्या प्रश्नावरुन ट्रम्प यांनी चीन आणि भारतावर याआधीही टीका केली आहे. त्यांनी म्हटलं होत की चीन आणि भारत असे देश आहेत की जिथे आपल्याला श्वास घ्यायलाही अडचण येते.
वातावरण बदलावर 2015 साली करण्यात आलेल्या पॅरिस करारातून अमेरिकेने माघार घेतली आहे. या करारामध्ये जागतिक हवामान हे 2 टक्क्यांपेक्षा खाली ठेवण्याचा उद्देश जाहीर करण्यात आला होता. त्यावेळी या करारामुळे अमेरिकन उद्योगांना आणि कामगार वर्गाला तोटा होईल या कारणामुळे ट्रम्प यांनी यातून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं होतं. या कराराचा सर्वाधिक फायदा हा केवळ चीन आणि भारताला होणार आहे अशी त्यांनी सातत्याने टीका केली आहे.
एका आठवड्यापूर्वी उत्तर कॅरोलिना राज्यात एका प्रचार सभेत बोलताना ट्रम्प म्हणाले होते की, "चीन, भारत आणि रशिया हे देश सर्वाधिक हवा प्रदूषण करत आहेत. आपल्याकडे सर्वाधिक चांगले वातावरण आहे, ओझोनचे प्रमाणही नियंत्रित आहे. त्याच वेळी चीन, भारत आणि रशिया हे देश सर्वाधिक प्रमाणात हवा प्रदूषित करत आहेत."
चीन हा जगातील सर्वाधिक कार्बनचे उत्सर्जन करणारा देश आहे. त्यानंतर अमेरिका, भारत आणि युरोपिन युनियनचा नंबर लागतो.