कोईम्बतूर: विधानसभा निवडणूक होत असलेल्या तामिळनाडूत चक्क नोटांनी भरलेले तीन ट्रक जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत मतदारांना रोख रूपयाचं आमिष दाखवलं जाऊ नये यासाठी प्रशासनाने नोटांचे चोरटे व्यवहार आणि वाहतूक रोखण्यासाठी भरारी पथके स्थापन केली आहेत. यापैकी एका भरारी पथकाने केलेल्या कारवाईत ही रक्कम पकडण्यात आली.
प्राथमिक तपासानंतर ही रक्कम तब्बल 570 कोटी रूपये असल्याचं सांगितलं जातंय. तीन ट्रक कंटेनरमध्ये ही रक्कम वाहून नेली जात होती. तसंच ही रक्कम स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मालकीची असून कोईम्बतूरहून विशाखापट्टणमला नेली जात होती.
तिरूप्पुर जिल्ह्यातील पैरूमन्नलूर-कुन्नातूर मार्गावर भरारी पथकाने केलेल्या कारवाईत पैशाची वाहतूक करणारे तीन ट्रक ताब्यात घेण्यात आले. आता या रकमेची चौकशी सुरू झालीय.
तामिळनाडूतील निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पैशाने भरलेल्या या तीन ट्रकसोबत साध्या वेशात आंध्र प्रदेश पोलीस आणि स्टेट बँकेचे अधिकारीही होते. भरारी पथकाने या ट्रक अडविण्याचा प्रयत्न केल्यावर ट्रक डायव्हर्सनी हे ट्रक जोरात पळवले. त्यामुळे भरारी पथकाचा संशय बळावला आणि मग या ट्रकचा पाठलाग करून त्या ताब्यात घेण्यात आल्या.
या ट्रकची पाहणी केल्यावर त्यामध्ये तब्बल 570 कोटी रूपयांच्या नोटा असल्याचं उघड झालं. या नोटांची वाहतूक करणाऱ्या ट्रक ड्रायव्हर्स तसंच त्या सोबत असलेल्या आंध्र प्रदेश पोलीस किंवा स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांकडे पुरेशी कागदपत्रे नव्हती. त्यामुळे ही रक्कक असलेले तीनही ट्रक तिरूप्पूर जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतले आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तामिळनाडूतील एका शाखेतून आंध्रातल्या दुसऱ्या शाखेत एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम पाठविण्याची आवश्यकता का पडली.. एवढी मोठी रक्कम वाहून नेण्यापूर्वी दोन्ही राज्यांच्या पोलिसांना अधिकृतपणे का कळवण्यात आलं नाही, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.
या सर्व प्रश्नांचा तपास करण्यासाठी तिरूप्पूर जिल्हा प्रशासनाने भारतीय रिझर्व बँक, आयकर अधिकारी, दोन्ही राज्यांचे पोलीस आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे अधिकारी यांचा समावेश असलेली समिती बनवली आहे.
तिरूप्पूर जिल्हा प्रशासनाने या पैशाने भरलेल्या ट्रकच्या सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव पोलीस दल तैनात केलं आहे.