नवी दिल्ली : माल वाहतूकदारांनी तब्बल आठ दिवसांनंतर अखेर संप मागे घेतला आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासोबतच्या बैठकीनंतर मालवाहतूकदारांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.


आज दिवसभरात माल वाहतूकदारांच्या शिखर संघटनेच्या शिष्टमंडळासोबत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या मॅरेथॉन बैठका झाल्या. त्यानंतर संघटनेने देशव्यापी पुकारलेला संप मागे घेण्याची घोषणा केली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही आपल्या ट्विटरच्या माध्यमातून सांगितले की, “ऑल इंडिया मोटर काँग्रेसचा संप मागे घेण्याचा निर्णय स्तुत्य आहे. त्यांनी सरकारचं आवाहन मान्य करुन संप मागे घेतला आहे.”

तसेच, माल वाहतूकदारांच्या मागण्यांबाबत सरकार संवेदनशील आहे. त्यांच्या काही मागण्या याआधीच मान्य केलेल्या आहेत. मात्र उर्वरित मागण्यांवर विचार करुन उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे, अशी माहितीही गडकरींनी दिली.

वाहतूक क्षेत्राचं देशाच्या विकासात महत्त्वाचं योगदान असून, चालकांसह या क्षेत्रात काम करणाऱ्यांचे विमा आणि आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी विशेष योजना बनवण्याचा निर्णय घेतला असल्याचेही गडकरींनी सांगितले. शिवाय, माल वाहतूकदारांना पंतप्रधान विमा योजनेत समाविष्ट करण्यासाठीही आम्ही प्रयत्न करु, असे आश्वासन गडकरींनी दिले.