नवी दिल्ली :  संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या तिहेरी तलाकप्रकरणी आज सुप्रीम कोर्टाने अंतिम निकाल सुनावला. कोर्टाने तिहेरी तलाकचा चेंडू केंद्र सरकारकडे टोलवत, सहा महिन्यात कायदा करण्याचा आदेश संसदेला दिला आहे. कायदा होईपर्यंत तिहेरी तलाकला बंदी घालण्यात आली आहे.


म्हणजेच आजपासून संसदेत कायदा तयार होईपर्यंत तिहेरी तलाकवर बंदी असेल. मात्र कायदा होण्यास विलंब लागला तरीही तिहेरी तलाकवरील बंदी कायम असेल.

सरन्यायाधीशांसह 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने आज आपला निर्णय दिला. मात्र तिहेरी तलाकवरुन 5 पैकी 3 न्यायाधीश हे तिहेरी तलाकविरोधात तर 2 न्यायाधीश हे तलाकच्या बाजूने होते.

तिहेरी तलाक आणि कोर्टाचा निर्णय

  1. आजपासून तिहेरी तलाक बंद. पण त्यासाठी संसदेने सहा महिन्यात कायदा करावा लागणार.

  2. सहा महिन्यात कायदा झाला नाही, तरीही तिहेरी तलाकवरील स्थगिती कायम असेल.

  3. आजपासून कोणीही तोंडी तलाक दिला तर तो अवैध असेल.

  4. सर्व राजकीय पक्षांनी मतभेद विसरुन केंद्र सरकारला कायदा बनवण्यासाठी मदत करा - सुप्रीम कोर्ट

  5. सरन्यायाधीशांसह 5 जणांच्या खंडपीठाचा  निर्णय, खंडपीठातील 5 पैकी 3 न्यायाधीश तलाकविरोधात, तर 2 तिहेरी तलाक च्या बाजूने.  न्यायमूर्ती नरिमन (पारशी), ललित (हिंदू) आणि कुरियन (ख्रिश्चन)यांच्या मते तिहेरी तलाक घटनाबाह्य, तर सरन्यायाधीश खेहर (शिख) आणि न्यायमूर्ती नाझीर (मुस्लिम) यांच्या मते, कायद्याचं उल्लंघन नाही.


आजच्या सुनावणीत सरन्यायाधीश काय म्हणाले?

सरन्यायाधीश जे एस खेहर यांच्यासह पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने अंतिम निर्णय दिला. खेहर म्हणाले, “तिहेरी तलाक प्रकरणी संसदेने लक्ष घालावं. संसदेने सहा महिन्यात कायदा करावा. त्यासाठी आम्ही तिहेरी तलाकवर सहा महिने स्थगिती घालत आहोत. जर या सहा महिन्यात कोणीही तोंडी तलाक दिला तर तो अवैध असेल”

सरन्यायाधीश खेहर यांच्यासह न्यायाधीश कुरिअन जोसेफ, रोहिंटन नरीमन, यू यू ललित आणि एस अब्दुल नझीर यांनी याबाबतचा निर्णय दिला.

तिहेरी तलाकमुळे घटनेच्या कलम 14,15,21 आणि 25 चं उल्लंघन होत नाही, असं खेहर म्हणाले. तर अन्य तीन न्यायमूर्तींच्या मते तिहेरी तलाक हा घटनाबाह्य आहे.

संबंधित बातमी

तिहेरी तलाकवर आजपासून बंदी: सुप्रीम कोर्ट

Triple Talaq : 5 पाईंटमध्ये समजून घ्या सुप्रीम कोर्टाचा निकाल

तिहेरी तलाक : मुस्लीम महिलांचा आवाज...शायरा बानो