मुंबई : देशभरातील बँका आज बंद राहणार आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाविरोधातील चर्चा निष्फळ ठरल्याने बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.


इंडियन बँक्स असोसिएशन, चीफ लेबर कमिशनर आणि डिपार्टमेंट ऑफ फायनान्शिअल सर्व्हिसेस यांच्यामध्ये बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा झाली. मात्र ती चर्चा निष्फळ ठरल्यामुळे बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.

दरम्यान, सार्वजनिक बँकांचे तात्काळ खासगीकरण होणार नाही. त्यामुळे फोरमने संप मागे घ्यावा, असे आवाहन ‘आयबीए’ आणि डिपार्टमेंट ऑफ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या अधिकाऱ्यांनी केलं आहे. या फोरममध्ये एआयबीईए, एआयबीओसी, एनसीबीई, एआयबीओए, बीईएफआय, आयएनबीईएफ, आयएनबीओसी, एनओबीडब्ल्यू, एनओबीओ या सर्व संघटना सामील आहेत.

सार्वजनिक बँकांचे खासगीकरण आणि बँकांचे विलीनीकरण व एकत्रिकरण करण्याला फोरमचा विरोध आहे. बँक
कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर फोरमच्या शिष्टमंडळाने 16 ऑगस्ट रोजी आयबीएची भेट घेतली. चर्चेत फोरमच्या एकाही मागणीवर निर्णय घेण्यास आयबीएने असमर्थता दर्शवत संप मागे घेण्याचे आवाहन केलं.