Wakefit Sleep Champion : रोज 100 दिवस 9 तासांच्या गाढ झोपेसाठी तुम्हाला पैसे मिळाले तर? हो हे खरं आहे. कोलकाता (Kolkata) येथील 26 वर्षीय तरूणी त्रिपर्णा चक्रवर्ती (Triparna Chakraborty) हिला तिच्या गाढ झोपण्याच्या कौशल्यासाठी 5 लाख रुपये मिळाले आहेत. त्रिपर्णाने Wakefit.co द्वारे एका इंटर्नशिप कार्यक्रमांतर्गत भाग घेतला होता, ज्यामध्ये 'इंडियाज फर्स्ट स्लीप चॅम्पियन' किताब जिंकल्यामुळे तिला मुकूट प्रदान करण्यात आला.
सलग 100 दिवस दिवसातून 9 तास झोप
त्रिपर्णाने Wakefit.co ला एका इंटर्नशिप प्रोग्रामसाठी अर्ज केला होता. हा सीझन जिंकण्यासाठी ती सलग 100 दिवसात 9 तास झोपली. तिने अंतिम फेरीत चार स्पर्धकांना पराभूत करून लाईव्ह स्लीप ऑफ हा किताब जिंकला. कंपनीने एक सोशल मीडिया पोस्ट टाकून त्रिपर्णाला वेकफिट स्लीप इंटर्नशिप सीझन 2 ची चॅम्पियन म्हणून घोषित केले आणि तिच्या कौशल्यांना 95% च्या स्कोअरसह रेटिंग दिली.
4.5 लाख स्पर्धकांना केले पराभूत
वेकफिट या होम आणि स्लीप सोल्यूशन्स कंपनीने आयोजित केलेल्या या स्लीपिंग स्पर्धेत सुमारे 4.5 लाख लोकांनी भाग घेतला आणि त्रिपर्णा चक्रवर्ती या सर्वांना पराभूत करून विजेती ठरली. संपूर्ण भारतात ही अनोखी झोपण्याची स्पर्धा आयोजित केली जात असल्याचे ऑनलाइन वेबसाइटच्या माध्यमातून कळल्यावर या स्पर्धेत भाग घेतल्याचे त्रिपर्णाने सांगितले.
कठोर परिश्रमा सोबतच, पुरेशी झोपही तितकीच आवश्यक
इंडिया टुडेशी बोलताना त्रिपर्णा म्हणाली, 'मी 4.5 लाख अर्जदारांपैकी एक असल्यामुळे उत्साही होते. तसेच प्रत्येकाला चांगले काम करण्यासाठी आठ तासांची झोप आवश्यक आहे असे तिने सांगितले. "कठोर परिश्रमा सोबतच, पुरेशी झोपही तितकीच आवश्यक असल्याचं ती म्हणाली.
या पॅरामीटर्सवर स्पर्धकांचे परीक्षण
स्पर्धेदरम्यान, झोपेचा कालावधी, जागे होण्याची वेळ, हलकी झोप आणि गाढ झोप या पॅरामीटर्सवर स्पर्धकांचे परीक्षण करण्यात आले. अंतिम फेरीत पोहचलेल्या स्पर्धकांनाही प्रत्येकी 1 लाख रुपये मानधन मिळाले. जीवनात पुरेशी झोप ही महत्वाची असून त्याबाबत जागरुकता पसरवण्यासाठी 100 दिवसांचा कार्यक्रम राबविण्यात आला.
9 तासांच्या शांत झोपेसाठी 10 लाख रुपये
स्पर्धेच्या पहिल्या सीझनमध्ये सुमारे 1.7 लाख अर्जदार होते आणि सीझन 2 च्या यशानंतर, वेकफिटने सीझन 3 ची घोषणा केली. फर्मने पुढील सीझनसाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे, जिथे विजेत्याला 100 रात्री 9 तासांच्या शांत झोपेसाठी 10 लाख रुपये दिले जातील. .