नवी दिल्ली : नोटबंदीच्या निर्णयामुळे टोल भरणाऱ्यांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. 24 नोव्हेंबर 2016 च्या मध्यरात्रीपर्यंत देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरील टोलवसुली बंद करण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली.

जुन्या नोटांचा तुटवडा, सुट्ट्या पैशांचा खोळंबा असल्याने केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता आणखी सात दिवस राष्ट्रीय महामार्गांवर टोल भरण्याची गरज नाही.


काळ्या पैशाविरोधात लढाईला बळ मिळावं म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठं पाऊल उचलत, 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी लोकांची धावपळ सुरु झाली. अनेकांचे दैनंदिन व्यवहारही कोलमडले. या पार्श्वभूमीवर लोकांच्या अडचणी कमी व्हाव्यात, म्हणून राष्ट्रीय महामार्गांवरील टोलवसुली 24 नोव्हेंबरपर्यंत बंद करण्यात आली आहे.