मुंबई: सध्या सोशल मीडियावर एकाच नावाने धुमाकूळ घातला आहे. सर्वत्र सोनम गुप्ता आणि तिच्या बेवफाईची चर्चा रंगली आहे. सुरुवातीला 10 रुपयांच्या नोटेवरुन सुरु झालेला हा प्रकार 2 हजारांच्या नोटेपर्यंत येऊन थडकला आहे. पण सर्वांनाच एक प्रश्न पडला आहे, तो म्हणजे सोनम गुप्ता आहे, तरी कोण?
कारण फेसबुक, ट्विटर व्हॉटसअॅप अशा सर्वच सोशल मीडियावरुन याच नावाची चर्चा आहे. एक नोट सोनम गुप्ताला बेवफा असल्याचे सांगते, तर दुसरी नोट सोनम गुप्ता निर्दोष असल्याचे सांगून तिच्या बेवफाईचे कारण स्पष्ट करते. पण सोनम कोण आहे, कुठे राहते याचा पत्ता कुणालाही माहित नाही. सर्वांना एकच माहित आहे की, सोनम गुप्ता ही बेवफा आहे.
वास्तविक, सोनम गुप्ताच्या बेवफाईची कथा 10 रुपयांच्या एका नोटेपासून सुरु झाली. एका खराब झालेल्या 10 रुपयांच्या नोटेवर सुरुवातीला 'सोनम गुप्ता बेवफा है' असे लिहून फेसबुकवर पोस्ट करण्यात आले. यानंतर याची चर्चा सर्वत्र सुरु झाली.
काही दिवसानंतर फेसबुकवरुन या नोटेचा फोटो गायब झाला. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याची घोषणा केल्यानंतर, पुन्हा सोनम गुप्ताचे नाव चर्चेत आलं. पण यावेळी 10 रुपयांची नोट नाही, तर नुकत्याच जन्मलेल्या 2000 रुपयांच्या नोटेवरुन सोनम गुप्ता बेवफा असल्याचं सांगण्यात आलं होतं. विशेष म्हणजे, यावेळी नोटांसोबत नाण्यांवरही सोनम गुप्ताच्या बेवफाईची माहिती देण्यात आली होती.
सोशल मीडियावर तर याचे युद्धच सुरु होते. एकवेळ असं वाटत होतं, जणू नोटाबंदीच्या निर्णयापेक्षा सोनम गुप्ताच्या बेवफाईचाच मुद्दा राष्ट्रीय मुद्दा बनतो की काय? कारण सोनम गुप्ताच्या बेवफाई सांगणाऱ्या नोटांच्या स्पर्धेला ' मी कुणालाही धोका दिलेला नाही, तुच मला दिला आहेस' असे मेसेज सोशल मीडियावर पोस्ट करण्यात येत होते. 10 रुपयांच्या नोटेविरुद्ध 100 रुपयांच्या नोटेवर 'मी बेवफा नाही, तर माझी मजबुरी असल्याचं' सांगण्यात आलं होतं. विशेष म्हणजे, सोनम गुप्ताच्या समर्थनासाठी तिची आईदेखील मैदानात उतरली. 500 रुपयांच्या नोटेवर, 'माझी मुलगी बेवफा नाही'-सोनम गुप्ताची आई असं लिहलं होतं.
आता तर 2000 रुपयांच्या नोटेवरुन सोनम गुप्ताने प्रत्युत्तर दिले असून, 'बेवफा मी नाही, तू आहेस सोनवीर सिंह!' असं लिहून त्याचा फोटो फेसबुकवर पोस्ट केला आहे. या युद्धात केवळ नोटाच नाही, तर एटीएममधून निघणाऱ्या कागदावरुनही तिच्या बेवफाईची कथा सांगण्यात आले आहे. सोनम गुप्ताच्या बेवफाईवरुन अनेकांनी खिल्लीही उडवली आहे. एका एटीएमबाहेर 'हे एटीएम काम करत नाही, याचे कारण सोनम गुप्ताची बेवफाई असं' सांगण्यात आलं होतं.
सोनम गुप्ताच्या बेवफाईचा मुद्दा राष्ट्रीय स्तरावरुन आतंरराष्ट्रीय मुद्दा बनला आहे. कारण अमेरिका, ब्रिटेन, मलेशिया आदी देशांच्या चलनी नोटांवरही सोनम गुप्ता बेवफा असल्याचं लिहून हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.
नोट आणि नाण्यांपासून सुरु झालेला हा विषय आता व्हिडीओच्या माध्यमातूनही प्रसारित करण्यात येत आहे. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावरुन कमालीचा व्हायरल होतो आहे. त्यामुळे सोनम गुप्ताची लोकप्रियता इतकी वाढली आहे की, ट्वीटरवर #SonamGuptaBewafaHai या हॅशटॅगचा ट्रेण्ड सुरु आहे. सोनम गुप्ता कोण आहे, याची माहिती कुणालाही नाही. पण तिच्या नावाने दोन फेसबुक पेजही तयार झाले आहेत.
सोनम गुप्ताच्या वेबफाई प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळालं आहे. प्रेमभंगाच्या या प्रकरणाने आता महिला सबलीकरणाच्या मोहीमेचा आकार घेतला आहे. डॉक्टर, इंजिनिअर सर्वजण सोनम गुप्ताच्या बेवफाईला योग्य असल्याचे सागंत असून, सोनम गुप्ताचे कौतुक करत आहेत.
ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ अनुपमा मोगा यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन सोनम गुप्ताचे समर्थन करुन सोनम गुप्ताचे अभिनंदन केले आहे. ''तू बेवफा होण्याच्या भीतीवर विजय मिळवला आहेस. आता तू कोणत्याही अडचणींशिवाय आपलं आयुष्य जगू शकतेस. आम्हाला तुझा गर्व आहे.'' असं त्यांनी लिहलंय. यामुळेच सोनम गुप्ताच्या बेवफाईपेक्षा तिचे प्रत्युत्तरच सर्वांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहेत.