मुंबई : आज दिवसभरात वेगवेगळ्या बातम्यांची ही नांदी आहे. ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी.. पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना, कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..


ज्ञानवापीसंदर्भात वाराणसी कोर्टात सुनावणी 


 ज्ञानवापीसंदर्भात (Gyanvapi Masjid) वाराणसी सत्र न्यायालय आणि सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी झाली. दोन्ही कोर्टाच्या सुनावणीकडे अख्ख्या देशाचं लक्ष होतं. ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षकारांनी केला होता. कोर्टानं दिलेल्या आदेशानुसार मशिदीची व्हिडीओग्राफी झाली आणि आता दोन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश कोर्टानं कमिटीला दिलेत. यावर उद्या सुनावणी होणार आहे. 


अभिनेत्री केतकी चितळेची पोलीस कोठडी आज संपणार


अभिनेत्री केतकी चितळेची पोलीस कोठडी आज संपणार आहे, ठाणे गुन्हे शाखा अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे सत्र न्यायालयात आज हजर करणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेला अटक करण्यात आली. अभिनेत्री केतकी चितळेविरोधात राज्यभरात आतापर्यंत  15  पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले.  गोरेगाव पोलीसही आज केतकी चितळेची कोठडी मागण्याची शक्यता आहे आज दुपारी केतकी चितळेला कोर्टात हजर करणार आहे 


खासदार नवनीत आणि आमदार रवी राणा यांचा जामीन रद्द होणार?


मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्यावरून उद्धभवलेल्या वादात जेलची हवा खाऊन बाहेर आलेल्या राणांविरोधात राज्य सरकारनं पुन्हा एकदा कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. जामीन देताना घातलेल्या अटी-शर्थींचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात मुंबई पोलिसांची सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. राणा दाम्पत्याचा जामीन रद्द करण्याची पोलिसांची मागणी आहे. न्यायमूर्ती राहुल रोकडे यांनी राणा दाम्पत्यांना नोटीस बजावत 18 मेपर्यंत कोर्टात हजर राहा अथवा वकिलामार्फत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहे. राणा दाम्पत्य आज वकिलांमार्फत न्यायालयात त्यांची भूमिका मांडण्याची शक्यता आहे.


खासदार संजय राऊतांविरोधात किरीट सोमय्या 100 कोटींचा दावा दाखल करणार 


शौचालय घोटाळ्याच्या नावाखाली बदनामी केल्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा किरीट सोमय्या शिवडी न्यायालयात खासदार संजय राऊतांविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार आहेत.  शौचालय घोटाळ्याच्या नावाखाली छळ आणि बदनामी केल्याचा भाजप नेते किरीट सोमय्यांचा आरोप. भारतीय दंड सहिता 499, 500 अंतर्गत फौजदारी मानहानीचा दावा/तक्रार दाखल करणार आहेत.  यापूर्वीच संजय राऊत यांना मानहानी, बदनामीची नोटीस दिली आहे, मुलुंड पोलिस स्टेशन येथे तक्रार ही दाखल केली आहे. एक रुपयाचा घोटाळा झालेला नसताना, घोटाळाचे पुरावे/ कागदपत्रं नसताना संजय राऊत यांनी फक्त , बदनाम करण्यासाठी हा अपप्रचार केला आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. 


 मुंबईतील 'या' भागात बुधवारी आणि गुरूवारी पाणीपुरवठा बंद


मुंबई महानगरपालिकेतर्फे पूर्व उपनगरामध्ये 'एन' विभागातील सोमय्या नाल्याखालून महानगरपालिका वसाहत, विद्याविहार या ठिकाणी  जलवाहिन्या वळविण्याचे काम बुधवार (18 मे)  सकाळी 10 पासून ते गुरुवार, (19 मे) सकाळी 10 वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे.  या कालावधीत मुंबईतील पूर्व उपनगरांमध्ये एल पूर्व  विभाग, एन विभाग, एम पश्चिम विभाग, एफ उत्तर विभाग, एफ दक्षिण विभागातील काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शहरातील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेसचं बालगंधर्व रंगमंदीर परिसरात एक तास मूक आंदोलन


केंद्रीय मंत्री स्मृती इराणी 16 मे रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे शिवानंद द्विवेदी लिखित अमित शहा आणि भाजपची वाटचाल या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी आल्या होत्या, यावेळी वैशाली नागवडे आणि त्यांच्या सहकारी महिलांकडून बालगंधर्व रंगमंदिरात घोषणाबाजी करण्यात आली नंतर भाजपचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांच्यात झटापट झाली होती. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण आणि विनयभंग झाल्याचा वैशाली नागवडे यांनी आरोप केल्यानंतर पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात रात्री गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. भाजप कार्यकर्त्यांवर कारवाईच्या मागणीसाठी सकाळी 9 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचं बालगंधर्व रंगमंदीर परिसरात एक तास मूक आंदोलन करण्यात येणार आहे


भाजप आमदार जयकुमार गोरेंच्या भवितव्याचा आज निर्णय


भाजप आमदार जयकुमार गोरेंच्या भवितव्याचा निर्णय आज होणार आहे. अटकपूर्व जामीनासाठी गोरेंची हायकोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणी सुनावणी पूर्ण झाली असून आज उच्च न्यायालय निर्णय देणार आहे. मृत व्यक्तीच्या नावे बोगस कागदपत्रं तयार केल्याचा आरोप गोरेंवर आहे. 


शीना बोरा हत्याकांड : इंद्राणी मुखर्जीच्या जामीन याचिकेवर आज सुनावणी


शीना बोरा हत्याकांड प्रकरणी इंद्राणी मुखर्जीच्या जामीन याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. 


कोलकाता नाईट रायडर्स  विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामना


मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात आज आयपीएल 2022 मधील 66 वा सामना खेळला जाणार आहे. दोन्ही संघ यंदाच्या हंगामातील आपपला अखेरचा सामना खेळणार आहेत. दरम्यान, प्लेऑफचं तिकीट निश्चित करण्यासाठी लखनौचा संघ मैदानात उतरणार आहे. तर, प्लेऑफच्या शर्यतीतील आव्हान टिकवण्यासाठी कोलकाताच्या संघ लखनौशी भिडणार आहे.