मुंबई : आज दिवसभरात वेगवेगळ्या बातम्यांची ही नांदी आहे. ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी.. पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना, कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..


सु्प्रीम कोर्टात आज ओबीसी आरक्षणाबाबत सर्वात मोठा फैसला


ओबीसी आरक्षणाबाबत मध्य प्रदेश सरकारचा रिपोर्ट सुप्रीम कोर्ट मान्य करणार का याचा फैसला आता आज होणार आहे.  महाराष्ट्रातल्या ओबीसी आरक्षणाच्या दृष्टीने देखील हा दिवस आणि निकाल महत्त्वाचा ठरणार आहे. आजच्या सुनावणीत मध्यप्रदेश सरकार ट्रिपल टेस्टच्या निकषांसह रिपोर्ट पूर्ण करण्यासाठी अधिकचा वेळ कोर्टाकडे मागत होते. मध्य प्रदेश सरकारला हा अधिकचा वेळ मिळणार का? की तिथेही ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुकांचे आदेश कोर्ट देणा याचा फैसला मंगळवारी होणार आहे. शुक्रवारी मध्यप्रदेशच्या सुनावणीनंतर कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे.


लिलावती रुग्णालयाच्या अडचणी वाढण्याची शक्यता 
 
खासदार नवनीत राणांचा एमआरआय टेस्ट करताना फोटो समोर आले आहे. यानंतर लिलावती रुग्णालयाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महापौर किशोरी पेडणेकर आणि मनिषा कायंदे वांद्रे हिल रोड पोलिसात तक्रार करण्याची शक्यता आहे मुंबई पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी लिलावती रुग्णालयाकडून अहवाल मागवला आहे.  अशातच आता सिटीस्कॅन करताना फोटो काढणे नियमांचे उल्लंघन असल्याने पालिकेच्या एच पश्चिम विभागाने लीलावती रुग्णालयाला नोटीस बजावली आहे. या नोटिशीत पालिकेने रुग्णालयाला पुढील 48 तासांत नोटीसीचे उत्तर द्या, असे निर्देश दिले आहेत.


मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरींना बेल की जेल


मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरींना बेल मिळणार की अटक होणार ?  आज दोघांच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणी. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी दोघांची अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही आरोपी फरार आहेत. 


अनिल देशमुखांच्या शस्त्रक्रियेचा आज फैसला


अनिल देशमुखांच्या शस्त्रक्रियेचा आज फैसला.खांद्यावरील शस्त्रक्रिया खाजगी रूग्णालयात करू देण्याची देशमुखांची मागणी. मात्र  ईडीचा देशमुखांच्या मागणीला विरोध, जेजेत ही शस्त्रक्रिया होऊ शकते. देशमुखांवर तातडीच्या शस्त्रक्रियेची गरज नाही, असा डॉक्टरांचा अहवालही कोर्टात सादर. देशमुखांच्या अर्जावर कोर्टाने निकाल राखून ठेवला, आज निकाल येणार आहे.


आज पहिल्या क्रमांकासाठी लढत 


लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात पुण्याच्या एमसीए मैदानावर आजचा सामना रंगणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता दोन्ही संघ आमने सामने येणार आहे. विजेता संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकवर पोहचणार आहे. तसेच जिंकणारा संघ प्ले ऑफमध्ये आपले स्थान पक्के करणार आहे. 


1927 : भारतीय लेखिका नयनतारा सहगल यांचा जन्म.


1993 : : संतोष यादव या दोनदा एव्हरेस्ट पर्वत सर करणार्‍या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.