Hariyali Teej 2021 Vrat rules: हिंदू धर्मामध्ये व्रत आणि सणांचं महत्व खूप जास्त आहे. यामधील एक व्रत म्हणजे हरियाली तीज व्रत. उत्तर भारतात मोठ्या उत्साहाने हे व्रत महिला करतात. मात्र महाराष्ट्रात हे व्रत हरतालिका व्रत म्हणून केलं जातं. हे व्रत महाराष्ट्रात पुढील महिन्यात 9 तारखेला असणार आहे. आज 11 ऑगस्ट रोजी हरीयाली तीज व्रत केलं जात आहे. हरियाली व्रताच्या दिवशी महिला आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी तसेच संततीप्रात्पीसाठी उपवास करतात आणि भगवान शंकर तसेच माता पार्वतीचं व्रत करतात.
हरियाली तीजला श्रावणी तीज असंही म्हटलं जातं. या दिवशी महिला उपवास करतात. या दिवशी कुणावर राग व्यक्त करु नये तसंच कुणाचा अपमान करु नये. दूधाचं सेवन करु नये, असं शास्त्रांमध्ये सांगितलं आहे.
भगवान शंकरासाठी देवी पार्वतीने केलं होतं व्रत
हरियाली तीज अर्थात हरतालिका साजरी करण्यामागे अशी अख्यायिका आहे की, भगवान शंकरासाठी देवी पार्वतीने सर्वात आधी हरतालिकेचं व्रत केलं होतं. हरतालिका दोन शब्द एकत्र येऊन तयार झालेला शब्द आहे. एक हरत आणि दुसरं आलिका. यामध्ये हरत चा अर्थ होतो अपहरण आणि आलिका चा अर्थ होतो सहेली. हे दोन शब्द एकत्र येऊन हरतालिका हा शब्द तयार झाला आहे.
हरियाली तीजची पौराणिक कथा आहे. यानुसार, पार्वतीच्या मैत्रिणी तिचं अपहरण करून तिला जंगलात घेऊन गेली होती. पार्वतीच्या इच्छेव्यतिरिक्त भगवान विष्णुने तिच्याशी विवाह करू नये म्हणून तिच्या मैत्रिणी तिला जंगलात घेऊन जातात. तिथे देवी पार्वतीने भगवान शंकराची आराधना केली आणि भाद्रपद शुल्क तृतीयेच्या दिवशी मातीचं शिवलिंग तयार करून त्याची पुजा केली. पार्वतीच्या तपस्येने प्रसन्न होऊन भगवान शंकराने देवी पार्वतीचा पत्नी म्हणून स्विकार केला.