On this day in history March 10  : आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 10 मार्च रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. सावित्रीबाई फुले यांची आज पुण्यातिथी आहे. तर तिथीनुसार आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली जाते. विष्णू वामन शिरवाडकर यांची पुण्यतिथी तर  मंगेश पाडगावकर यांची जयंती आजच आहे. भारतात 10 मार्च हा ‘केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल’ (सी. आय. एस. एफ) राईझिंग डे म्हणून दर वर्षी साजरा करण्यात येतो. याशिवाय इतिहासात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.


छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (तिथीप्रमाणे) 


हिंदवी स्वराज्याचे सम्राट असे नाव ज्यांच्या कारकीर्दीने कोरले गेले ते शिवाजी महाराज. त्यांच्या अद्वितीय कामगिरीमुळे त्यांना रयतेचा राजा म्हटलं जातं. देशभरात शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने मोठ्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. दरवर्षी शिवप्रेमी मोठ्या आतुरतेने आपल्या लाडक्या राजाच्या जयंतीची वाट बघत असतात. मात्र शिवप्रेमींमध्ये वेगवेगळे गट आहेत. काही जण तारखेनुसार तर काही जण तिथीनुसार शिवजयंती साजरी करतात. 10 मार्च रोजी तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाते.  शिवाजी महाराज हे एक थोर महापुरुष होते. त्यांचे विचार, त्यांचे कर्तृत्व, स्वराज्य स्थापना तसेच राज्य कारभार असे सर्व बोध समाज मनाला होण्यासाठी शिवजयंती प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणावर समाजातील सर्व स्तरांतील लोकांकडून साजरी केली जाते. 


सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी


सावित्रीबाई फुले यांची आज पुण्यातिथी आहे. प्लेगच्या रूग्णांची सेवा करत असताना त्या स्वत: देखील प्लेगच्या बळी पडल्या आणि 10 मार्च 1897 रोजी त्यांचे निधन झाले.  सावित्रीबाई फुले यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. सावित्रीबाई आणि त्यांचे पती यांनी 1848 मध्ये भिडे वाड्यात पुण्यात मुलींच्या शाळेची स्थापना केली होती. 


विष्णू वामन शिरवाडकर यांची पुण्यतिथी 


ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, कवी व नाटककार विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांची आज पुण्यातिथी आहे. 10 मार्च 1999 रोजी त्यांचं निधन झालं होतं. 1987 मध्ये त्यांनी लिहिलेल्या नटसम्राट नाटकाला ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. या नाटकावर चित्रपटही प्रदर्शित झालेला आहे. कुसुमाग्रजांच्या कविता या मराठी भाषेचा दागिना आहेत. त्यामुळेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.  कुसुमाग्रज यांचा जन्म नाशिक येथे 27 फेब्रुवारी 1912 रोजी झाला होता. महाराष्ट्राच्या मायबोलीला साहित्यात विशेष स्थान निर्माण करुन देण्यात कुसुमाग्रजांचं मोलाचं योगदान आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. 


 मंगेश पाडगावकर यांची जयंती


या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे, असं म्हणत जगण्याचं गाणं गाणारा कवी मंगेश पाडगावकर यांची आज जयंती. मंगेश पाडगावकर यांचा जन्म 10 मार्च 1929 रोजी वेंगुर्ले येथे झाला. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, सांगा कसं जगायचं, जेव्हा तुझ्या बटांना यासारख्या पाडगावकरांच्या अनेक कवितांना रसिक वाचकांचं प्रेम लाभलं होतं. धारानृत्य, जिप्सी, भोलानाथ यासारख्या अनेक कवितासंग्रहांमुळे ते आबालवृद्धांचे लाडके झाले. पाडगावकरांची काव्यवाचनाची विशिष्ट शैली अनेकांना भावत असे. 


जिप्सी, निंबोणीच्या झाडामागे, छोरी शर्मिष्ठा, उत्सव अशा अनेक काव्यसंग्रहांना रसिकांचं भरभरुन प्रेम मिळालं. 1980 मध्ये त्यांना 'सलाम' या कवितासंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तर 2013 मध्ये पद्मभूषणने त्यांचा गौरव करण्यात आला होता. याशिवाय महाराष्ट्र भूषण पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा म.सा.प. सन्मान पुरस्कारही त्यांना मिळालं होतं. त्यांनी 2010 मध्ये विश्व साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही भूषवलं होतं. 30 डिसेंबर 2015 रोजी वयाच्या 86 व्या वर्षी मंगेश पाडगावकर यांनी मुंबईत राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.


सीआईएसएफ स्थापना दिन (CISF Raising Day)


सीआईएसएफ स्थापना दिन दरवर्षी 10 मार्च दिवशी उत्साहात साजरा केला जातो. 1969 साली या दलाची स्थापना झाली आहे. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर दिल्लीतील मुख्यालयामध्ये 10 मार्च दिवशी जोषपूर्ण वातावरणामध्ये सीआईएसएफ दिवस साजरा केला जातो. 


महात्मा गांधींना 6 वर्षांची शिक्षा  -


प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल महात्मा गांधी यांना सहा वर्षांची शिक्षा झाली होती. महात्मा गांधींना 10 मार्च 1922 रोजी अहमदाबाद येथे पकडण्यात येऊन राजद्रोहाच्या आरोपाखाली सहा वर्षांच्या कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. गांधींनी न्यायालयापुढे आपण राजद्रोह केला हे मान्य केले व सांगितले,  ब्रिटिश राज्यपद्धती आणि तिचा कायदा हा भारतीय जनतेच्या हिताच्या विरुद्ध आहे.  


माधवराव शिवाजीराव शिंदे यांची जयंती - 


काँग्रेसचे दिवंगत नेते माधवराव शिवाजीराव शिंदे यांचा जन्म आजच्याच दिवशी 1945 मध्ये झाला होता. त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री, नागरी हवाई वाहतूक मंत्री पद सांभाळले आहे.  त्यांचं निधन 30 सप्टेंबर 2001 मध्ये मैनपुरी उत्तर प्रदेशमध्ये झालं.  त्यांचा मुलगा ज्योतिरादित्य यांनी भाजपात प्रवेश केला असून ते सध्या केंद्री मंत्री आहेत.  


ओसामा बिन लादेन याचा जन्म -


अल कायदा या अतिरेकी संघटनेचा संस्थापक ओसामा बिन लादेन याचा जन्म 10 मार्च 1957 मध्ये सौदी अरेबियामध्ये झाला होता. अमेरिकेची आर्थिक राजधानी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या न्यूयॉर्क शहरातील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ला ओसामा बिन लादेन यांच्या अतिरेकी संघटनेनं केला आहे. 9/11 नंतर अल-कायदा व बिन लादेनचा खात्मा करण्यासाठी अमेरिका व त्याच्या काही मित्र राष्ट्रांनी मिळून पश्चिम आशियात दहशतवादाविरुद्ध युद्ध पुकारले. लादेन हा अब्जाधीश उद्योगपती मोहम्मद बिन लादेन यांचा मुलगा. त्याच्या वडिलांचा विमान अपघातात मृत्यू झाला होता. या विमान अपघातासाठी एका अमेरिकन पायलटला जबाबदार धरण्यात आलं होतं. वडिलांच्या मृत्यूच्या वेळी ओसामा तरुण होता. वयाच्या 17 व्या वर्षी ओसामानं पहिल्यांदा एका सीरियन मुलीशी लग्न केलं, जी त्याच्या नात्यातीलच होती. त्यानंतर त्यांनं एकूण पाच लग्नं केली असून त्याला एकूण 23 मुलं असल्याचं सांगितलं जातं.


पाकिस्तानचा पराभव -


आजच्याच दिवशी 1985 मध्ये भारताने पाकिस्तानला पराभूत करून मेलबोर्न येथे बेन्सन अॅण्ड हेजेस चॅम्पियनशिप (Benson Hedges World Championship of Cricket) क्रिकेट स्पर्धा जिकली होती. 


रवी शास्त्रींचा सन्मान - 


भारतीय क्रिकेट संघाने रवी शास्त्री यांना दहा मार्च 1985 रोजी चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स हा किताब दिला. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांनी संघात भरीव योगदान दिले. रवी शास्त्री यांनी एकूण 80 कसोटी सामन्यांमध्ये 11 शतके आणि 12 अर्धशतकांच्या मदतीने 3 हजार 830 धावा केल्या, त्यासोबतच त्यांच्या नावावर 151 विकेट्सही आहेत.