On This Day In History: आज स्वामी विवेकानंद (Swami Vivekanand) यांची जयंती आहे. स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस भारतात राष्ट्रीय युवा दिवस (National Youth Day) म्हणून साजरा केला जातो. धर्म, मानवता, स्वातंत्र्य, वेदान्त तत्वज्ञान या सारख्या इतर अनेक विषयांवर त्यांचे विचार नेहमीच प्रत्येक भारतीयाला मार्गदर्शक ठरतात. धर्माच्या विषयावरील त्यांच ज्ञान विशाल होतं. स्वामी विवेकानंदांचा जन्म 12 जानेवारी 1863 मध्ये कोलकात्यात झाला. त्यांच मुळ नाव नरेंद्रनाथ दत्त होतं. त्यांचे वडील कोलकाता उच्च न्यायालयात वकील होते तर आई भूवनेश्वरी देवी या धार्मिक विचारांच्या होत्या. 1879 साली त्यांनी प्रेसीडेन्सी महाविद्यालयात प्रवेश परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. ईश्वराच्या शोधात असलेल्या विवेकानंदांना रामकृष्ण परमहंस हे गुरुस्थानी लाभले आणि त्यांच्या जीवनाने वेगळी दिशा घेतली. रामकृष्ण परमहंसांची आणि विवेकानंदांची भेट 1881 साली कोलकात्यातील दक्षिणेश्वर काली मंदिरात झाली. त्यावेळी परमहंसांनी विवेकानंदाना मानवतेची सेवा हीच ईश्वराची सेवा असल्याचा मंत्र दिला. या मंत्राचा जप विवेकानंदांनी पुढे आयुष्यभर केला. स्वामी विवेकानंदानी शिकागो येथे आजपासून सुमारे 11 सप्टेंबर 1893 रोजी जागतिक धर्म संमेलनात भाग घेतला. त्यांठिकाणी विवेकानंदानी धर्म आणि मानवता यावर केलेल्या ऐतिहासिक भाषणाचा आजही प्रत्येक भारतीयाला गर्व आहे. शिकागोमध्ये गेल्यानंतर विवेकानंदांनी भारतीय धर्म, मानवता आणि संस्कृतीवर दिलेल्या भाषणाने अनेकांना आश्चर्यचकीत केलं.विवेकानंदांना दम्याचा त्रास होता. त्यामुळे 4 जुलै 1902 साली वयाच्या अवघ्या 39 व्या वर्षी बेलूर येथील मठात त्यांचा मृत्यू झाला. बेलूर येथील गंगा नदीच्या किनाऱ्यावर त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले.
1598: राजमाता जिजाऊंचा जन्मदिन (Rajmata Jijabai Birth Anniversary)
आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माता राजमाता जिजाऊ यांची (Rajmata Jijabai) जयंती आहे. राजमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा या गावात झाला. जिजाऊंच्या वडिलांचे नाव लघुजी जाधव आणि आईचे नाव म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई असे होते. जिजाऊंना चार भाऊ होते. दत्ताजी, अचलोजी, रघुजी आणि महादुजी असे जिजाऊंच्या भावांची नावे होती. जिजाऊ दांडपट्टा आणि अश्वारोहण या युद्ध कलांमध्ये पारंगत होत्या. डिसेंबर 1605 मध्ये त्यांचा विवाह शहाजी राजे भोसले यांच्यासोबत दौलताबाद येथे झाला. शहाजी राजे निजामशाहीचे सरदार होते. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंनी शिवबांना जन्म दिला. जिजाऊंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली तर दोन मुले होती. जिजाऊंनी शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केले. शिवबांना त्यांनी लहानपणीच रामायण, महाभारताच्या गोष्टी सांगितल्या. त्याचबरोबर जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराज युद्ध कला शिकले.
1931: प्रसिद्ध शायर अहमद फराज यांची जयंती (Ahmad Faraz)
आज प्रसिद्ध आणि बहुचर्चित शायर अहमद फराज यांची जयंती आहे. ऊर्दू शायर अहमद फराज यांचा जन्म 12 डिसेंबर 1931 रोजी नौशेहरा (पाकिस्तान) येथे झाला. प्रेमातील मिलन, विरह, प्रतीक्षा यावरचे तरल संवेदनशील शेर ही त्यांच्या शायरीची खासियत आहे.
1972: काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांचा जन्मदिन (Priyanka Gandhi BIrthday)
काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांचा आज वाढदिवस आहे. प्रियांका गांधी यांचा जन्म 12 जानेवारी 1972 रोजी झाला.
1984: राष्ट्रीय युवा दिवस (National Youth Day)
देशात दरवर्षी 12 जानेवारीला राष्ट्रीय युवा दिवस साजरा केला जातो. 1984 मध्ये भारत सरकारने हा दिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून घोषित केला होता.
इतर महत्वाच्या घटना -
1708: मराठा साम्राज्याचे पाचवे छत्रपती शाहू संभाजी भोसले महाराजांचा राज्याभिषेक.
1869: भारतरत्न पुरस्काराने सन्मानित शास्त्री भगवान दास यांचा जन्म.
1915: महिलांना मतदानाचा अधिकार देण्याचा प्रस्ताव अमेरिकन संसदेने फेटाळला.
1924: भारतीय स्वातंत्र्य सैनिक गोपीनाथ साहा यांची पुण्यतिथी.
1931: सोलापूरचे क्रांतिवीर किसन सारडा, मल्लाप्पा धनशेट्टी व कुरबान हुसेन यांना फाशी.
1992: शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ ’ कुमार गंधर्व’ यांची पुण्यतिथी.
2005: अभिनेते अमरीश पुरी यांची पुण्यतिथी.