मुंबई : संपूर्ण जगभर आजचा दिवस 'प्रेस फ्रिडम डे' (प्रेस स्वातंत्र्य दिन/वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन)म्हणून साजरा केला जातो. जगातील सर्व देशांमधील सरकारे, सत्ताधारी आणि राजे या सर्वांना वृत्तपत्र स्वातंत्र्याचे महत्व कायम लक्षात राहावे यासाठी जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. युनेस्कोने 1993 मध्ये 3 मे हा जागतिक वृत्तपत्र दिन साजरा करण्यास मंजुरी दिली.
1991 मध्ये आफ्रिकेतील पत्रकारांनी पत्रकारांच्या स्वातंत्र्यासाठी पुढाकार घेऊन एका विशेष मोहीमेला सुरुवात केली. 3 मे 1991 रोजी नामेबियाची राजधानी विंडहोक येथे पत्रकारांची परिषद भरली होती. या परिषदेत पत्रकारांच्या लिखाणाच्या स्वातंत्र्यांचा जाहीरनामा (Declaration of Windhoek) प्रसिद्ध झाला. त्याच्या पुढील वर्षापासून (1992 सालापासून) 3 हा दिवस प्रेस फ्रिडम डे (प्रेस स्वातंत्र्य दिन) म्हणून साजरा केला जाऊ लागला. 1993 मध्ये युनेस्कोने जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिन साजरा करण्यास मंजुरी दिली.
जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी दरवर्षी एक विशेष थीम ठेवलेली असते. माध्यमांनी निवडणुकांमध्ये आणि लोकशाही टिकवण्यासाठी मोठी आणि महत्त्वाची भूमिका निभवावी, असा संदेश आजच्या दिवसाच्या माध्यमातून दिला जाणार आहे.
युनेस्कोने यावर्षी इथोपियाची राजधानी अदिस अबाबा येथे वर्ल्ड प्रेस फ्रिडम डे निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तसेच युनेस्कोचे महासंचालक आज जगभरातील माध्यमांच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या पत्रकारांना युनेस्कोचा मानाचा गुलेर्मो कॅनो वर्ल्ड प्रेस फ्रिडम प्राईज या पुरस्काराने गौरवणार आहेत.