नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात काँग्रेसने दाखल केलेल्या तक्रारींचा येत्या 6 मेपर्यंत निकाल लावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. आचारसंहिता भंग केल्याचा आरोप करत काँग्रेसने नरेंद्र मोदींविरोधात एकूण 11 तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यापैकी 3 तक्रारींचा निकाल निवडणूक आयोगाने दिला आहे.

मोदींविरोधातील तक्रारींवरील सुनावणी संथगतीने सुरु असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेस खासदार सुश्मिता देव यांनी याप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. गुरुवारी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने याप्रकरणी निवडणूक आयोगाला 6 मे पर्यंत तकारींचा निकाल लावण्याचे आदेश दिले आहेत.

आचारसंहिता भंगप्रकरणी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात 11 तक्रारी दाखल केल्या आहेत. नुकतेच त्यापैकी तीन प्रकरणात निवडणूक आयोगाने नरेंद्र मोदींना क्लीन चीट दिली आहे.