Islamabad : तब्बल 74 वर्षांनी दोन भावांची भेट झाली आहे. 1947 ला भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली, त्यावेळी ऐकमेकांपासून दुरावलेले दोन भाऊ अखेर भेटले आहे. या दोन्ही भावांची भेट करतारपूरमध्ये झाल्याचे स्थानिक प्रसारमाध्यमांनी सांगितले. या दोन भावांच्या भेटीदरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या भेटीदरम्यान दोन्ही भावांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. तिथे असलेल्या सर्वांसाठीच हा भावनिक क्षण होता. व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.


इंटरनॅशलन न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातील फैसलाबाद सिद्दिकी राहतात. तर त्यांचा मोठा भाऊ हबीब हे भारतातील पंजाबमधील फुलनवाल या ठिकाणी राहतात. सिद्दिकी हे पाकिस्तनातून आपल्या मोठ्या भावाची भेट घेण्यासाठी आले होते. करतारपूरमध्ये ही भेच झाली. करतारपूर कॉरिडॉर हा पाकिस्तानला भारताच्या सिमेशी जोडणारा भाग आहे. फाळणीच्या वेळी सिद्दिकी हे लहान होते. फाळणीदरम्यान, सिद्दीकी हे पाकिस्तानात गेले आणि त्यांचा मोठा भाऊ हबीब हे भारतात आले. तब्बल ७४ वर्षानंतर या दोन भावंडांची भेट झाल्याने हा एक भावनिक क्षण होता. यावेळी दोघांनी ऐकमेकांना मिठी मारुन आपल्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी दोघांनांही अश्रू अनावर झाले. या भेटीदरम्यान, हबीब यांनी करतारपूरच्या उपक्रमाचे कौतुक केले. कॉरिडॉर सुरू केल्याने मला माझ्या भावाशी पुन्हा भेटायला मिळाले असे हबीब यांनी सांगितले.


द न्यूज इंटरनॅशनलच्या म्हणण्यानुसार, हबीब यांनी आपला धाकटा भाऊ असणाऱ्या सिद्दिकीला या कॉरिडॉरच्या माध्यमातून आपण भेटत राहू असे सांगितले.  करतारपूर कॉरिडॉर उघडल्याबद्दल या दोन्ही भावांनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे आभार मानले. कारण हा कॉरिडॉर सुरू केल्यामुळेच आम्हा दोघा भावांची भेट झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने नोव्हेंबर 2019 मध्ये करतारपूर कॉरिडॉर उघडण्याचा निर्णय घेतला होता. 4.7 किलोमीटर लांबीचा हा करतारपूर कॉरिडॉर आहे. मात्र, नंतरच्या काळात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला. त्यामुळे खबरदारी म्हणून हा कॉरिडॉर बंद करण्यात आला होता.