UP Assembly Election 2022 : देशातील 5 राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. उत्तर प्रदेशसह इतर 4 राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशकडे सर्व देशाचं लक्ष लागले आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आणखी एक धक्का बसला आहे. मंत्रिमंडळातील आणखी एका मंत्र्याने आपला राजीनामा दिला आहे.  स्वामी प्रसाद मौर्य यांच्यानंतर आता दारा सिंह चौहान (Dara Singh Chauhan) यांनीही आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जातोय. याच मुद्यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत भाजपला टोला लगावला आहे. संजय राऊत यांनी 'उत्तर प्रदेश.. परिवर्तन की ओर..' असे ट्वीट केले आहे.


मागच्या दोनच दिवसापूर्वी स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर दारा सिंह चौहान यांनीही आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे लागोपाठ भाजपला उत्तर प्रदेशमध्ये दोन धक्के बसले आहेत. दारा सिंह चौहान हे मऊ जिल्ह्यातील मधुबन विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. दारा सिंह चौहान यांनी राज्यपाल यांच्याकडे आपला राजीनामा दिलाय. दलित, मागास, शेतकरी, बेरोजगार युवक आणि व्यापाऱ्यांची घोर उपेक्षा झाल्यामुळे मी योगी मंत्रिमंडळातून राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.


चौहान यांच्या राजीनाम्यानंतर उत्तर प्रदेशचे उप मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते केशव प्रसाद मौर्य (Keshav Prasad Maurya) यांनी ट्वीट करत फेरविचार करण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान, याआधी स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी भाजप पक्षाचाही राजीनामा दिला असून ते आता समाजवादी पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासोबत तीन आमदारांनीही राजीनामा दिला होता. त्यानंतर आज आणखी एका नेत्याने राजीनामा दिला आहे. दारा सिंह चौहान (Dara Singh Chauhan) बसपा आणि सपा या पक्षाचे सदस्यही राहिलेले आहेत. बसपामधून विधानपरिषदेचे आमदार राहिले होते, त्यानंतर राज्यसभेतही गेले होते.  त्यानंतर बसपा सोडून सपामध्ये दाखल झाले होते. सपामध्ये घोसी येथून खासदार म्हणून निवडूण आले होते. 2014 मध्ये पराभव झाला होता. त्यानंतर 2017 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. मऊ जिल्ह्यातील मधुबन येथील मतदार संघात आमदार झाले, त्यांना मंत्रिपदही मिळाले.  


महत्त्वाच्या बातम्या: