नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयानं अँबी व्हॅलीच्या लिलावाला स्थगिती देण्याची विनंती फेटाळली आहे. त्यामुळं सुब्रतो रॉय यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. विशेष म्हणजे, सुब्रतो रॉय जेव्हा सेबीकडे दीड हजार कोटींची रक्कम जमा करतील. तेव्हाच अँबी व्हॅलीच्या लिलावाला स्थगिती देण्यात येईल, असं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलंय.


लोणावळ्यातील अँबी व्हॅलीच्या लिलावाची प्रक्रिया थांबण्यात यावी, यासाठी सहारा समुहानं काल बुधवार 9 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्ययालयाला पुन्हा विनंती केली होती. यावेळी सहारा समुहानं गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यात येतील, असं आश्वासनही सर्वोच्च न्यायालयाला दिलं होतं.

पण आज झालेल्या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टानं सहारा समुहाची याचिका फेटाळून लावली आहे. तसेच जोपर्यंत दीड हजार कोटींची रक्कम जमा होत नाही. तोपर्यंत लिलावाला स्थगिती देण्यात येणार नाही, असं स्पष्ट शब्दात सुनावलं आहे. तसेच अँबी व्हॅलीच्या लिलावाची प्रक्रिया सुरू ठेवण्याचे, आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत.

दरम्यान, सहारा समुहाच्या वतीनं कपिल सिब्बल आणि मुकुल रोहतगी या दिग्गज वकिलांनी बाजू मांडली. मात्र, सुप्रीम कोर्टानं सहारा वकिलांच्या युक्तीवादाला नकार देत, स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे कोर्टाच्या दणक्यानंतर अँबी व्हॅली सहारा समुहाच्या हातून जाणार की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.

संबंधित बातम्या

'अँबी व्हॅली' स्वतःकडे राखण्यासाठी 'सहारा' समुहाची धडपड