Delhi Airport : दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल-1 वर छत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. आज (28 जून) शुक्रवारी सकाळी टर्मिनल 1 वर विमानतळाचे छत कोसळले. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून सुमारे 6 जण जखमी झाले आहेत. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि बचावकार्य सुरू केले. दिल्ली अग्निशमन सेवेकडून मिळालेल्या माहितीनुसार, सर्वांना वाचवण्यात आले आणि रुग्णालयात नेण्यात आले.






दिल्ली फायर सर्व्हिसेसच्या अधिकाऱ्याने सांगितले की, दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल-1 वर छत कोसळले. अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. या अपघातानंतर सुरुवातीला चार जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. आता जखमींची संख्या 6 झाली आहे. ताज्या माहितीनुसार, एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.






अग्निशमन दलाने अडकलेल्या एका व्यक्तीची सुटका केली


अग्निशमन सेवेकडून मिळालेल्या माहितीनुसार, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-1 चे छत कोसळल्याचा फोन शुक्रवारी पहाटे 5.30 वाजता त्यांना आला. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. आतापर्यंत तीन जखमींना रुग्णालयात नेण्यात आले होते, मात्र एक जण अडकला होता. त्याची  सुटका झाली आहे.


जबलपूर विमानतळावरही अपघात


दुसरीकडे, पहिल्या पावसात जबलपूरचे नवीन विमानतळ सुद्धा तग धरू शकले नाही. 450 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या डुमना विमानतळावर गुरुवारी (27 जून) टर्मिनल बिल्डिंगच्या ड्रॉप अँड गो एरियातील छत कोसळले.यामध्ये एका कारचा चक्काचूर झाला. या घटनेत आयकर विभागाचा एक अधिकारी आणि त्याचा ड्रायव्हर थोडक्यात बचावले.




दिल्लीत पहिला जोरदार पाऊस


शुक्रवारी दिल्लीत मान्सूनचा पहिला जोरदार पाऊस झाला. पहाटे साडेचार ते पाच वाजेपर्यंत मुसळधार पावसाने दिल्ली भिजली. मात्र, त्यामुळे सकाळपासूनच शहरात पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. अनेक ठिकाणी लांबच लांब ट्रॅफिक जाम असून लोकांना तिथे पोहोचण्यासाठी दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या