Congress Meeting : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. पाचपैकी चार राज्यात भाजपला तर पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने सत्ता मिळवली आहे. पाचपैकी एकमेव काँग्रेसची सत्ता असलेल्या पंजाब राज्यात काँग्रेसला धक्का बसला आहे. दरम्यान, काँग्रेसने आता हिमाचल प्रदेश आणि गुजरात या राज्यामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर फोकस केला आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi ) यांनी हिमाचल प्रदेशमधील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीवर चर्चा करण्यात आली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा, प्रभारी राजीव शुक्ला, प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कुलदीप राठोर, खासदार प्रतिभा वीरभद्र सिंह आणि राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते. दरम्यान, हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राज्यात पक्ष कसा मजबूत करता येईल यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. दुसरीकडे, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जगदीश ठाकोर आणि पक्षाचे प्रदेश प्रभारी रघु शर्मा यांची भेट घेऊन विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा केली. या भेटीत ठाकोर यांनी राहुल गांधींना पुढील महिन्यात काढण्यात येणाऱ्या गांधी संदेश यात्रेचे निमंत्रणही दिले. या दोघांच्या भेटीत संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल हे देखील उपस्थित होते.
बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जगदीश ठाकोर म्हणाले की, गुजरातमध्ये निवडणुका होणार आहेत, यावर चर्चा झाली. संघटना आणि आगामी कार्यक्रमांवरही चर्चा झाली. राहुल गांधींच्या भेटीसोबतच ठाकोर आणि शर्मा यांनी काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाच्या पदाधिकाऱ्यांचीही भेट घेऊन आगामी निवडणुकांबाबत चर्चा केली. त्यांनी काँग्रेस सेवादलाचे प्रमुख लालजी देसाई आणि इतर अनेक नेत्यांशी संघटनात्मक बाबींवर चर्चा केली. गुजरातमध्ये या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: