अहमदाबाद : आपण महाराष्ट्रात अनेक विहिरी पाहिल्या, त्यावर चित्रपट देखील बघितले, पण गुजरातमधल्या अहमदाबादपासून 18 किमीवर असलेल्या अडलाज गावाजवळची सरस्वती नदीच्या तीरावरची विहीर अतिशय अनोखी आहे. ही नदी गांधीनगरपासून फक्त 5 किलोमीटर अंतरावर आहे. अडालज या गावाला प्राचीन काळात 'दांडई देश' या नावाने ओळखले जायचे. ही विहीर म्हणजे पुरातन कलेचा अद्भुत नमुना आहे. तिला 'अडालज की बावडी' किंवा 'राणी की वाव' असंही म्हणतात. म्हणजेच आपल्या मराठीत विहीर. ही विहीर खूप पुरातन असून राजा महाराजांच्या काळातला इतिहास या विहिरीला लाभलेला आहे.
ही विहीर पाच मजली आणि अष्टभुजाकार असून 16 स्तंभांवर उभी आहे. या विहिरीत वास्तुकलेचा अद्भुत नमुना आपल्याला पाहायला मिळतो, तर भारतीय वास्तुशिल्पासोबतच इस्लामिक बनावटीची डिझाईनही स्पष्ट दिसते. तसेच ही स्थापत्यकलेचा एक अद्भुत नमुना आहे. ही विहीर 1498 मध्ये बांधली असून आजही या बांधकामात दिसणारे दगडी नक्षीकाम आपल्याला थक्क करते.
ही विहीर जितकी जुनी आहे तितकाच तिचा इतिहास देखील अंगावर शहारे आणणारा आहे. या विहिरीचे बांधकाम रणवीर सिंह यांनी सुरु केलं होतं. तर त्यांची पत्नी राणी रुपबा यांनी तिला पूर्णत्वास नेलं. या विहिरीसाठी त्यांना खूप मोठा त्याग करावा लागला. ज्या वेळी या विहिरीचे काम सुरु झालं त्यावेळी रणवीर सिंह यांच्या राज्यावर सुलतानी संकट आलं. रणवीर सिंह यांच्या राज्यावर हल्ला झाला आणि तो हल्ला करणारा सुलतान अबुल नसिर उद दिन मोहम्मद शहा यांनी केला होता. अहमदाबाद शहर स्थापन करणाऱ्या अहमदशाह प्रथमचा नातू सुलतान महंमद मदगड यांनी पुढे अनेक वर्ष गुजरातवर राज्य केलं. रणवीर सिंहसोबत झालेल्या युद्धात सुलतानाचा विजय झाला आणि रणवीर सिंग यांना युद्धात वीरगती प्राप्त झाली. रणाजी यांच्या राणीसाहेब राणी रुपबा अत्यंत रुपवान आणि देखण्या होत्या. ही माहिती सुलतानाला समजल्यावर सुलतान राणीकडे लग्नाची मागणी करु लागला, पण राणीने अट घातली की त्यांच्या पतीने हाती घेतलेलं विहिरीचे काम पूर्ण केलं तर लग्नाला संमती देईन. मग विहिरीचे काम पूर्णत्वास नेलं. संत-सजनांना विहिरीच्या पाण्यात स्नान करुन देऊन पाणी पवित्र केले आणि मग याच विहिरीत आपला शेवट केला.
युनेस्कोने 2014 साली या विहिरीला जागतिक वास्तुस्थळात समाविष्ट केले आणि या विहिरीला राणी असा किताब दिला. या वास्तुकलेच्या सुंदर विहिरीला सोलंकी साम्राजाच्या काळात बनवण्यात आलं होतं. तसंच दहाव्या शतकात बनवण्यात आलेली ही विहीर सोलंकी वंशाची भव्यदिव्यता दर्शवत असल्याचं आपल्याला दिसतं. या विहिरीची उंची 64 मीटर असून रुंदी 20 मीटर आणि खोली 27 मीटर आहे. या विहिरीच्या खाली एक छोटासा दरवाजा असून त्यात 30 किलोमीटर एवढी लांब सुरुंग आहे. पण ती सध्या माती आणि दगडाने बंद केले आहे.
वास्तुकलेच्या नमुन्याप्रमाणे या विहिरीची रचना मारु गुर्जारा आर्किटेक्चर स्टाईलप्रमाणे करण्यात आली आहे. तर या राणीच्या विहिरीमध्ये एक मंदिर असून त्यात पायऱ्यांच्या सात रांगा असून त्यामध्ये 1500 पेक्षा जास्त नक्षीदार मूर्ती कोरलेल्या आहेत. विहिरीवर सूर्याची किरणे काही वेळापुरतीच भिंतीवर पडतात, त्यामुळे आतमधले तापमान 6 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी असते.
आजही या गावातील लोक येथे येऊन भिंतीवर बनवलेल्या नवग्रह मूर्तींची पूजा करतात. या भिंतीवर कलश आणि गणपती बाप्पा यांचीसुद्धा प्रतिमा दिसून येते. या विहिरीच्या जवळच काम करणाऱ्या कारागिरांची समाधी आहे. पुन्हा अशा अद्भुत कलेची निर्मिती होऊ नये यासाठी राजाने या कारागिरांना मारलं होतं.