Textile industry : वस्त्रोद्योग क्षेत्रात (Textile industry) 4.5 कोटी प्रत्यक्ष रोजगार (Employment) निर्माण होतील, असा अंदाज केंद्र सरकारनं (Central Govt) व्यक्त केला आहे.  विणकाम आणि प्रक्रियेच्या आधुनिकीकरणासह वस्त्रोद्योगातील रोजगार, गुंतवणूक क्षेत्राची व्याप्ती वाढवण्यासाठी सरकार विविध योजना आणि कार्यक्रम राबवत असल्याचं सांगण्यात आलं आहे. औद्योगिक उत्पादनाच्या टक्केवारीच्या बाबतीत वस्त्रोद्योगाचे सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीतील (GDP) योगदान गेल्या तीन वर्षांत 7 टक्के होते. याबाबतची माहिती राष्ट्रीय लेखा सांख्यिकीने (National Accounts Statistics) प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत देण्यात आली आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश (Darshana Jardosh) यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात याबाबतची माहिती दिली. 


वस्त्रोद्योग उत्पादन वाढवण्यासाठी सरकारचं प्रोत्साहन 


दरम्यान, जागतिक स्तरावर भारतीय वस्त्रोद्योग उत्पादनांचा वाटा वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं सातत्यानं प्रयत्न करत आहे. उत्पादन वाढव्यासाठी वस्त्रोद्योगासाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजना आणि प्रधानमंत्री मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रीजन आणि अ‍ॅपरेल पार्क्स (पीएम- मित्र ) योजनेला 3 वर्षांच्या कालावधीत 7 मेगा टेक्सटाइल पार्क उभारण्यासाठी मान्यता दिली आहे. कापडासाठी पीएलआय योजना देशात उच्च मूल्याच्या मॅन मेड फायबर (एमएमएफ), आणि तांत्रिक वस्त्रांच्या उत्पादनास प्रोत्साहन देईल असं केंद्र सरकारनं सांगितलं आहे. कापड उद्योगाच्या संपूर्ण मूल्य-साखळीसाठी तसेच वस्त्रोद्योगाचे उत्पादन आणि स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी एकात्मिक  पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर आधुनिक औद्योगिक पायाभूत सुविधा विकसित करणं हा पी-एम मित्र योजनेचा उद्देश आहे.


'या' योजनांच्या माध्यमातून वस्त्रोद्योग क्षेत्राची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न 


वस्त्रोद्योग क्षेत्रात 4.5 कोटी प्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील, असा अंदाज सरकारनं व्यक्त केला आहे. विणकाम आणि प्रक्रियेच्या आधुनिकीकरणासह वस्त्रोद्योगातील रोजगार, गुंतवणूक आणि या क्षेत्राची व्याप्ती वाढवण्यासाठी सरकार विविध कार्यक्रम राबवत आहे. त्यात एकात्मिक प्रक्रिया विकास योजना, राष्ट्रीय हातमाग विकास कार्यक्रम, राष्ट्रीय हस्तकला विकास कार्यक्रम, सामर्थ-वस्त्र क्षेत्रातील क्षमता वाढीसाठी योजना, सिल्क समग्रा 2 आणि एकात्मिक वस्त्रोद्योग उद्यानांसाठी योजनांचा समावेश आहे.


देशात कापसाचं पुरेस उत्पादन 


विविध प्रकारची नैसर्गिक संकट येऊनसुद्धा देशात कापसाचं (Cotton) पुरेसं उत्पादन होण्याचा अंदाज केंद्र सरकारकडून व्यक्त करण्यात आला आहे. देशात कापसाचे उत्पादन अंदाजे  341.91 लाख गाठी असल्याची माहिती केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश यांनी दिली आहे. देशात अंदाजे कापसाचा वापर हा 311 लाख गाठी असल्याचे दर्शना जरदोश यांनी सांगितले. यावर्षी काही ठिकाणी अतिवृष्टीचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. यातून काही शेतकऱ्यांनी कशीबशी त्यांची पीक वाचवली होती, मात्र, पुन्हा परतीच्या पावसाचा काही ठिकाणी पिकांना मोठा फटका बसला आहे. विशेषत:  महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भात शेती पिकांचं मोठं यावर्षी नुकसान झालं आहे. तिथे कापूस आणि सोयाबीन पिकांना फटका बसला आहे. मात्र, नैसर्गिक संकट येऊनसुद्धा एकूणच देशाचा विचार केला तर यावर्षी कापसाचं पुरेसं उत्पादन होणार असल्याची माहिती दर्शना जरदोश यांनी दिली.


महत्त्वाच्या बातम्या:


Textiles Export: वस्त्रोद्योग क्षेत्रापुढे येत्या 5-6 वर्षात 100 अब्ज डॉलर्स निर्यातीचे लक्ष्य: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल