बंगळुरु : ऑस्ट्रलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात टीम इंडिया मालिका विजयाच्या इराद्याने उतरली आहे. मात्र या सामन्यात टीम इंडियाने आणखी एक गोष्ट करुन सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पहिल्यांदा गोलंदाजीची संधी मिळालेल्या भारतीय संघाने आपल्या हातावर काळी पट्टी लावत मैदानावर पाऊल टाकलं. भारताचे माजी क्रिकेटपटू बापू नाडकर्णी यांचं शुक्रवारी निधन झालं. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी भारतीय संघाच्या खेळाडूंनी काळी पट्टी लावली आहे. बीसीसीआयने देखील आपल्या ट्विटर हॅंडलवरुन नाडकर्णी यांना श्रद्धांजली अर्पण केली होती.


नाडकर्णी यांनी 1955 ला न्यूझीलंड विरूद्ध दिल्लीमध्ये कसोटीमध्ये पदार्पण केले. तर त्यांनी आपला शेवटचा कसोटी सामना ऑकलॅडमध्ये न्यूझीलंडविरूद्ध 1968 साली खेळला होता. नाडकर्णींच्या नावावर कसोटीमध्ये एका डावात सलग 21 षटकं निर्धाव टाकण्याचा विक्रम आहे. त्यांनी 1964 मध्ये इंग्लंड विरूद्ध मद्रास कसोटीमध्ये सलग 21 षटकं निर्धाव टाकली होती.

भारताचे माजी कसोटीवीर रमेशचंद्र उर्फ बापू नाडकर्णी यांचं शुक्रवारी वृद्धापकाळानं निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. अचूक टप्पा आणि अचूक दिशा राखणारा डावखुरा फिरकी गोलंदाज अशी बापूंची एका जमान्यात ख्याती होती. नाडकर्णी यांनी कारकीर्दीतल्या 41 कसोटी सामन्यांत 1411 धावा आणि 88 विकेट्स अशी अष्टपैलू कामगिरी बजावली होती. 43 धावांमध्ये 6 विकेट्स ही त्यांची कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी होती. बापूंनी प्रथम दर्जाच्या 191 सामन्यांमध्ये 8 हजार 880 धावा आणि 500 विकेट्स अशी दुहेरी कामगिरी बजावली होती. त्यांच्या निधनानंतर माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर, सुनिल गावस्कर यांनी बापूंना आदरांजली वाहिली होती.


सलग 21 निर्धाव षटकं टाकण्याच रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. भारताचा कसोटीमधील सर्वात कंजूस गोलंदाज म्हणून त्यांना ओळखलं जातं. चेन्नईमधील एका सामन्यात त्यांनी 32 षटकांपैकी 27 षटकं निर्धाव टाकली होती. 32 षटकात त्यांनी अवघ्या 5 धावा दिल्या होत्या.

पाकिस्तानविरुद्ध कानपूरमध्ये खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्याच्या एका डावात बापूंनी 34 षटकं गोलंदाजी केली होती. त्यापैकी 24 षटकं त्यांनी निर्धाव टाकली होती. त्यात त्यांनी अवघ्या 23 धावा दिल्या होत्या. त्याच मालिकेत दिल्लीत खेळवण्यात आलेल्या सामन्यात त्यांनी 34 षटकात 24 धावा देत एक बळी मिळवला होता. या डावातही त्यांनी तब्बल 24 षटकं निर्धाव टाकली होती.

संबंधित बातम्या 
माजी क्रिकेटर बापू नाडकर्णींचं निधन, सचिन आणि गावस्करांकडून आदरांजली