नवी दिल्ली: काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिक याला दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी एनआयए कोर्टाने दोषी ठरवलं आहे. त्यानंतर आता पाकिस्तानचे पित्त खवळलं असून त्या ठिकाणाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. एनआयएच्या या निर्णयाविरोधात पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदी आणि अब्दुल बाशिद यांनी ट्वीट केलं आहे.
भारत पाकिस्तानचा कोणताही मुद्दा असो त्यावर भाष्य करायचं आणि प्रसिद्धीच्या झोतात रहायचं ही शाहिद आफ्रिदीची नेहमीची स्ट्रॅटेजी आहे. आताही त्याने यासिन मलिकच्या बाजूने एक ट्वीट केलं आहे. शाहिद आफ्रिदी यांने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "भारताकडून मानवाधिकारांचे हणन केलं जात आहे, या विरोधात आपण संयुक्त राष्ट्रामध्ये धाव घेणार आहे. जम्मू काश्मिरच्या स्वातंत्र्यासाठी यासिन मलिक काम करत होता आणि त्याला दोषी ठरवलं आहे. भारताने या प्रकरणी मानवाधिकारांचे उल्लंघन केलं आहे. संयुक्त राष्ट्राने या प्रकरणात आता हस्तक्षेप करणे गरजेचं आहे."
पाकिस्तानचे पूर्व राजदूत अब्दुल बाशिद यांनीही भारतीय न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्याप्रकरणी काश्मिरचा फुटिरतावादी नेता यासिन मलिकला एनआयए कोर्टाने दोषी ठरवलं आहे. यासिन मलिक याने याआधीच काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिली होती. त्यानंतर एनआयए विशेष कोर्टाने 19 मे रोजी त्याला दोषी ठरवले होते. आज एनआयए कोर्टात शिक्षेवर सुनावणी झाली. एनआयएने यासिन मलिकला फाशीच्या शिक्षेच्या मागणी केली आहे.
यासिन मलिकविरोधात देशविरोधी कारवायांचा आरोप होता. मलिक विरोधात 'युएपीए' कायद्यातील कलमांसह इतरही अनेक गुन्हे दाखल होते.