Telangana CM K. Chandershekhar : 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात विविध घडामोडी घडत आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (CM K. Chandrashekar Rao) हे सातत्यानं भाजपच्या विरोधात सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र यावं अशी भूमिका मांडत आहेत. 2024 च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर के. चंद्रशेखर राव हे विविध राज्यातील नेत्यांच्या गाठी भेटी घेत आहेत. दरम्यान, के चंद्रशेखर राव यांनी  'भाजप मुक्त भारत' असा नारा देत तेलंगणा राष्ट्र समिती (Telangana Rashtra Samithi) राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. 


2024 ला बिगरभाजप सरकार आल्यास शेतकऱ्यांना मोफत वीज


तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव  हे सोमवारी निजामाबाद इथे बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. वेगळ्या राज्याच्या आंदोलनापासून प्रेरणा घेऊन 'भाजप मुक्त भारत' या नाऱ्याखाली टीआरएस राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करेल असे त्यांनी सांगितले. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत बिगरभाजप सरकार स्थापन झाल्यास देशभरातील शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जाईल, असेही के चंद्रशेखर राव यांनी सांगितले. 


TRS ची राष्ट्रीय राजकारणात प्रवेशाची तयारी


तेलंगणातील विकासाचे मॉडेल देशभरात लागू करण्यासाठी तेलंगणा राष्ट्र समिती राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करणार असल्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी जाहीर केले आहे. टीआरएस लोकांच्या पाठिंब्याने भारताचा चेहरा बदलेल असंही ते म्हणाले. निजामाबाद हे एक समृद्ध शहर आहे. लोकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आम्ही लवकरच निजामाबादमधून राष्ट्रीय पातळीवरील निवडणूक प्रचाराला सुरुवात करु, असेही के चंद्रशेखर राव म्हणाले.


पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा 


के चंद्रशेखर राव यांनी सोमवारी निजामाबाद इथे 58 कोटी रुपये खर्चाच्या जिल्हाधिकारी संकुल आणि टीआरएस जिल्हा कार्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी तिथे जाहीर सभेला संबोधित केले. कृषी क्षेत्राला 1.45 लाख रुपयांची मोफत वीज देण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या असमर्थतेवर त्यांनी सवाल उपस्थित केला.  दरम्यान,गेल्याच आठवड्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे बिहारच्या दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेऊन चर्चा केली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं या दोन नेत्यांची झालेली भेट महत्वाची मानली जात आहे.


महत्त्वाच्या बातम्या: