PM Modi on PM SHRI Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी सोमवारी शिक्षक दिनानिमित्त प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया (PM SHRI Yojana) योजनेची घोषणा केली. याअंतर्गत देशभरात 14,500 शाळा विकसित आणि श्रेणीसुधारित केल्या जातील. शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी ही मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज शिक्षक दिनी मला एका नवीन उपक्रमाची घोषणा करताना आनंद होत आहे. 'प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया (PM-SHRI) योजनेंतर्गत, संपूर्ण भारतात 14,500 शाळा विकसित आणि श्रेणीसुधारित केल्या जातील. या शाळा आदर्श बनतील ज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा (NEP) संपूर्ण आत्मा अंतर्भूत होईल.


अद्ययावत तंत्रज्ञान, स्मार्ट क्लासरूम, क्रीडा आणि आधुनिक पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित करून शाळांमध्ये शिक्षण देण्याचा PM-श्री हा एक आधुनिक, परिवर्तन घडवणारा आणि सर्वांगीण मार्ग असेल, असं पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी तीन ट्वीट करत यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. 






पंतप्रधान मोदी बोलताना म्हणाले की, "PM-श्री हा शाळांमध्ये शिक्षण देण्याचा आधुनिक, परिवर्तनशील आणि सर्वांगीण मार्ग असेल. अद्ययावत तंत्रज्ञान, स्मार्ट क्लासरूम, खेळ आणि बरंच काही यांसह आधुनिक पायाभूत सुविधांवर देखील लक्ष केंद्रित केलं जाईल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानं अलिकडच्या वर्षांत शिक्षण क्षेत्राचा कायापालट केला आहे. मला खात्री आहे की, PM-श्री शाळेचा NEP च्या माध्यमातून भारत भरातील लाखो विद्यार्थ्यांना फायदा होईल." 


पंतप्रधान कार्यालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, "पीएम-श्री शाळा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील सर्व घटक प्रतिबिंबित करतील आणि अनुकरणीय शाळा म्हणून काम करतील आणि आसपासच्या इतर शाळांनाही मार्गदर्शन करतील.' पीएमओच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या माहितीमध्ये म्हटलं आहे, 'याचा उद्देश शाळा केवळ दर्जेदार अध्यापन, शिक्षण आणि संज्ञानात्मक विकासासाठीच नव्हे तर 21व्या शतकातील कौशल्याच्या गरजांशी सुसंगत सर्वांगीण आणि सु-विकसित नागरिक तयार करण्यासाठी देखील असतील.'


पंतप्रधानांनी शिक्षकांशी संवाद साधला


पंतप्रधान मोदींनी सोमवारी शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांशी संवाद साधला. यादरम्यान पंतप्रधान म्हणाले की, आपल्याला केवळ विद्यार्थ्यांना शिकवायचं नाही तर त्यांचं जीवनही बदलायचं आहे. भारत आपली शैक्षणिक परिसंस्था मजबूत करण्यासाठी योग्य दिशेनं वाटचाल करत आहे. 


शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही केलं ट्वीट 


केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं आहे. ते म्हणाले की, "राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आणि भारतात सुज्ञ समाज बनवण्याच्या दिशेनं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे.






पुढे बोलताना त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रयोगशाळा, ज्यामध्ये 14,500 अनुकरणीय शाळा त्यांच्या अनुभवात्मक, सर्वांगीण, चौकशीवर आधारित आणि विद्यार्थ्यांवर आधारीत असलेल्या अध्यापनशास्त्रासह मानवतावादी दृष्टिकोन असलेल्या चांगल्या व्यक्ती तयार केल्या जातील. पुढे बोलताना प्रधान म्हणाले की, 'पंतप्रधान-श्री शाळा या क्षेत्रातील इतर शाळांमध्ये अभ्यासाचं वातावरण निर्माण करण्यासाठी आणि शैक्षणिक निकाल सुधारण्यासाठी प्रयत्न करतील.'